कंपनी व्यवस्थापनाविरोधात प्रतीकात्मक अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:42 AM2021-05-07T04:42:05+5:302021-05-07T04:42:05+5:30
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील औद्योगिकीकरणामुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने ग्रामीण भागात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. याला आळा ...
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील औद्योगिकीकरणामुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने ग्रामीण भागात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी कंपन्या बंद ठेवण्याची मागणी करत खंडाळा तहसील कार्यालयावर अंत्ययात्रा काढून मागणीचे निवेदन देण्यात आले.
खंडाळा तालुक्यातील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी असंवेदनशील असलेल्या प्रशासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे यांना निवेदन देण्यात आले. दि. ७ ते २३ मेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून सर्व कारखाने बंद न ठेवल्यास तहसील कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
शासनाने लॉकडाऊनचे नियम व निर्बंध कडक केले असले तरी कंपनी प्रशासनाचे वागणे बेजबाबदार असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, तर तालुक्यात अनेक कंपन्यांमध्ये येणारे कामगार कोरोनाची चाचणी खासगी लॅबमध्ये करीत आहेत. अनेक जण सोयीस्कर रिपोर्ट घेत असल्याने ते इतर लोकांमध्ये वावरत असतात. त्यातीलच काही पॉझिटिव्ह झाल्यास त्याचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे कंपनी प्रशासनाने सरकारी तपासणी करणे गरजेचे आहे, अथवा कंपनीने कामगारांची स्वतंत्र व्यवस्था करणे गरजेचे आहे. पण असे घडताना दिसत नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्व कंपन्या बंद ठेवाव्यात, अशी आग्रही मागणी केली आहे.
याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, माजी सभापती रमेश धायगुडे, अनिरुद्ध गाढवे, प्रा. एस. वाय. पवार, प्रदीप माने, रामदास कांबळे, गणेश जाधव, सागर ढमाळ, अंकुश पवार, चंद्रकांत ढमाळ, गोविंद गाढवे, सुजीत डेरे, श्रीकांत घाटे, अजय धायगुडे, प्रमोद जाधव, राजेंद्र नेवसे, शैलेश गाढवे आदी उपस्थित होते.