न्यायासाठी महिला सदस्यांचा सभेत टाहो
By admin | Published: January 30, 2015 10:40 PM2015-01-30T22:40:27+5:302015-01-30T23:13:10+5:30
कऱ्हाड पंचायत समितीचे सभागृह स्तब्ध
कऱ्हाड : पंचायत समितीची मासिक सभा नेहमीच वादळी ठरते. आज, शुक्रवारच्या सभेतही तसेच वादळ उठले; पण या वादळामुळे संपूर्ण सभागृहच काही काळ स्तब्ध झाले. आपल्या प्रश्नांना न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त करीत महिला सदस्यांनी भर सभेत उभे राहून अश्रू ढाळले आणि ‘आम्हाला न्याय द्या,’ असा टाहो सभापतींपुढे फोडला. परंतु, त्यांना समाधानकारक उत्तर न देताच नेहमीप्रमाणे पदाधिकाऱ्यांनी त्यांची बोळवण केली. सभेत आज दुपारी बांधकाम विभागाचा आढावा सुरू असताना विरोधी सदस्या अनिता निकम उभ्या राहिल्या. ‘आम्ही वेळोवेळी अनेक विषय, सूचना, मते सभागृहात मांडतो; पण त्याची दखल ना अधिकारी घेतात, ना पदाधिकारी. सभेत मांडलेल्या ठरावांची प्रशासन पूर्तता होत नाही. मग आम्ही सभागृहात ठराव का मांडावेत,’ अशी विचारणा त्यांनी केली़ रडत-रडत त्यांनी पूर्वी मांडलेल्या सूचना व ठरावाच्या नोंदी वाचून दाखविल्या.
‘त्यांचे काय झाले ते अगोदर सांगा आणि नंतर नवीन ठराव मांडा,’ असा आग्रह धरला. त्यांच्या रडण्यामुळे सभागृह अवाक् झाले. सभागृहात शांतता पसरली; यावेळी सत्ताधारी गटाच्या रूपाली यादव त्यांच्या मदतीला धावून आल्या.
‘अनेक ठराव आम्ही सभेत करूनही कामे का केली जात नाहीत,’ अशी विचारणा करून त्यांनीही सभापतींवर शाब्दिक हल्ला चढविला. या प्रश्नाला सभापती समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. (प्रतिनिधी) (संबंधित वृत्त पान २)
नारीशक्ती एकवटली
पंचायत समितीच्या सभागृहात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि अपक्ष अशा मिळून बारा महिला सदस्या आहेत. एरवी नेत्यांचा आदेश मानून सदस्यांच्या सुरात सूर मिसळणाऱ्या सर्व गटांच्या महिला आज एकवटल्या. अनिता निकम अश्रू ढाळत असताना रूपाली यादव, ज्योती गुरव यांनी उभे राहून निकम यांची पाठराखण केली. इतर महिला सदस्यांनी मूकसंमती दिली.