Satara: झाडानी येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करा, जिल्हा प्रशासनाचे वाई प्रांताधिकाऱ्यांना पत्र

By दीपक शिंदे | Published: June 12, 2024 07:06 PM2024-06-12T19:06:49+5:302024-06-12T19:07:43+5:30

जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाइकांनी ६४० एकर जमिनीचा व्यवहार केला

Take action against unauthorized construction in Jhadani, district administration's letter to wai officials | Satara: झाडानी येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करा, जिल्हा प्रशासनाचे वाई प्रांताधिकाऱ्यांना पत्र

Satara: झाडानी येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करा, जिल्हा प्रशासनाचे वाई प्रांताधिकाऱ्यांना पत्र

सातारा : झाडानी, ता. महाबळेश्वर येथे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाइकांनी ६४० एकर जमिनीचा व्यवहार केला आहे. याठिकाणी ४० एकरांमध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आले असून, कारवाई करावी आणि त्याचा अहवाल तत्काळ सादर करावा, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिले आहेत.

झाडानी येथील ग्रामस्थांची दिशाभूल करून जीएसटी आयु्क्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाइकांनी गावातील ६४० एकर जमिनीचे व्यवहार केल्याचा आरोप करून याठिकाणी ४० एकरांत अनधिकृत बांधकाम आणि कमाल जमीन धारणा कायदा उल्लंघनप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली होती. तसेच याप्रकरणी विविध ठिकाणी तक्रारीही केल्या होत्या. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी वाई प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चंद्रकांत वळवी यांच्यासह तिघांना नोटीस बजावून ११ जूनला कागदपत्रांसह लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यात कमाल जमीन धारणाचा उल्लेख होता. 

त्यानुसार दि. ११ रोजी सुनावणी होऊन आता दि. २० जूनला सुनावणी होणार आहे. तथापि, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी वाई प्रांताधिकाऱ्यांना झाडानी येथील ६२० एकरांपैकी ४० एकरांत झालेल्या अनधिकृत बांधकामप्रकरणी पत्र पाठवले आहे. यामध्ये वाई प्रांतांच्या अहवालानुसार झाडानीतील ४० एकरांत अनधिकृत बांधकाम झाल्याचे दिसून येत आहे. या बांधकामावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील ४५ अन्वये नियमानुसार कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईचा अहवाल तत्काळ सादर करावा, असे आदेश दिले आहेत.

दरम्यान, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बफर व संवेदनशील क्षेत्रातील जंगलतोड, खाणकाम, बांधकाम, खोदकाम तसेच कोअर क्षेत्रातील वेळे, देऊर, मळे, कोळणे, पाथरपुंज, खिरखिंडी, गोठणे, कुंडी, खुंदलापूर, आदी गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न, बफर क्षेत्रातील १८ नागरी सुविधा, व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रातील जमीन खरेदी व्यवहारांची चौकशी करणे, कांदाटी खोऱ्यातील १६ गावांसाठी रुग्णवाहिका सेवा, नवजा (ता. पाटण) येथील ओझर्डे धबधब्याचे व्यवस्थापन स्थानिक जनवन समितीकडे द्यावे, हिंस्र वन्यजिवांच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर लोकांना तत्काळ मदत, वासोटा किल्ला, ओझर्डे धबधबा परिसरात प्लास्टिक संकलन केंद्राची उभारणी, आदी मागण्या मोरे यांनी उपोषणादरम्यान केल्या होत्या. या मागण्यांबाबत कार्यवाही होत असल्याची माहिती मोरे यांनी दिली.

Web Title: Take action against unauthorized construction in Jhadani, district administration's letter to wai officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.