जादा दराने खत विक्री झाल्यास कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:27 AM2021-06-03T04:27:20+5:302021-06-03T04:27:20+5:30

सातारा : रासायनिक खतांच्या किंमती कमी झाल्यानंतर पोत्यांवरील वाढीव दर एमआरपीचा फायदा घेत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची लुबाडणूक होत ...

Take action if fertilizer is sold at excess rate | जादा दराने खत विक्री झाल्यास कारवाई करा

जादा दराने खत विक्री झाल्यास कारवाई करा

googlenewsNext

सातारा : रासायनिक खतांच्या किंमती कमी झाल्यानंतर पोत्यांवरील वाढीव दर एमआरपीचा फायदा घेत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या कृषी समिती सभेत चर्चा झाली. यानंतर सभापती मंगेश धुमाळ यांनी कारवाईची सूचना केली. तसेच खरीप हंगामात खते व बियाणे साठा मुबलक आहे. टंचाई भासणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची मासिक सभा सभापती मंगेश धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. या सभेस जिल्हा कृषी विकास अधिकारी विनायक पवार, अनिल काळे, सदस्य राजेश पवार, प्रतीक कदम, सुरेखा जाधव, प्रियांका ठावरे, आदी उपस्थित होते.

या सभेत प्रारंभी खरीप हंगामाचा आढावा घेण्यात आला. सद्यपरिस्थितीत खतांच्या किमती कमी होऊनही पोत्यांवर एमआरपी असल्याचे सांगून त्या दराने विक्री होत असल्याची तक्रार काही सदस्यांनी केली. वास्तविक केंद्र सरकारने खतांच्या किमती कमी केल्यानंतर सध्याच्या दराने विक्री होणे आवश्यक असतानाही काही ठिकाणी शेतकऱ्यांची लुबाडणूक होत आहे. याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी आल्या होत्या. यासाठी कृषी विभागाने ठोस पावले उचलली असून वाढीव दराने खत विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना केली आहे, असे मंगेश धुमाळ यांनी सांगितले.

जिल्ह्यात तालुकानिहाय घेतल्या जाणाऱ्या पिकांनुसार अनुदानावर डीबीटीच्या माध्यमातून वाटाणा, सोयाबीन, भात, बाजरी, मका बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी याबाबत पंचायत समिती स्तरावर नोंदणी करावी. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मेलद्वारे नोंदणी करावी. लॉकडाऊन उठल्यानंतर याबाबतची हार्ड कॉपी द्यावी, असेही धुमाळ यांनी स्पष्ट केले.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खते, बियाणे यांची टंचाई भासू नये, यासाठी कृषी विभागाकडून तालुकानिहाय आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे जिल्हा कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांनी सांगितले.

.........................................................................

Web Title: Take action if fertilizer is sold at excess rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.