दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई करा
By Admin | Published: September 1, 2014 10:25 PM2014-09-01T22:25:46+5:302014-09-01T23:06:35+5:30
वजराई धबधबा : पर्यटकांकडून पुन्हा विनापावत्या शुल्कवसुली केल्याची तक्रार
सातारा : भारतातील सर्वांत उंच वजराई धबधबा सातारा तालुक्यातील भांबवली गावाच्या हद्दीत असताना कासला येणाऱ्या पर्यटकांकडून विनापावत्या शुल्क घेण्यास पुन्हा एकदा प्रारंभ झाला असल्याची तक्रार भांबवली ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात भांबवलीच्या सरपंच नवाबाई मोरे आणि ग्रामस्थ मंडळ यांनी म्हटले आहे की, गेल्या वर्षी शुल्कवसुली बंद करण्याचे आदेश कास येथील संबंधितांना देण्यात आले असूनही पुन्हा एकदा ‘कास-वजराई धबधबा’ असे फलक लावून विनापावत्या शुल्कवसुली सुरू झाली आहे. हा धबधबा भांबवली गावच्या हद्दीत असून, ‘विकिपीडिया’नेही त्याची दखल घेतली आहे. माध्यमांमुळे हा धबधबा प्रसिद्ध झाल्यानंतर गेल्या वर्षी त्याचा गैरफायदा घेण्यासाठी ‘कास-वजराई धबधबा’ असे फलक लावून कासला आलेल्या पर्यटकांना धबधब्याचे वरचे टोक दाखवून दिशाभूल आणि फसवणूक केली जात होती. पावतीपुस्तकाद्वारे पैसे गोळा केले जात होते.
भांबवली वन हक्क समितीने या बेकायदा गोष्टी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. कास गाव जावली तालुक्यात असल्याने जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांनी जावलीच्या तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिले. तहसीलदारांनी मेढा पोलिसांना आदेश देऊन कासमधील संबंधितांना त्यांच्यासमोर हजर करण्यास सांगितले. तहसीलदारांनी कास ग्रामस्थांना बेकायदा वसुली बंद करण्याचे तसेच ‘कास-वजराई धबधबा’ हा अनधिकृत फलक काढून टाकण्याचे आदेश दिले. असे अनधिकृत कृत्य केल्यास कारावास व पुन्हा असे कृत्य केल्यास कारावास व दंडठोठावण्यात येईल, अशी तंबी दिली. ग्रामस्थांनी अजाणतेपणी झालेल्या चुकीची माफी मागितली आणि आदेशाचे पालन करण्याचे मान्य केले. तथापि, यंदाच्या हंगामातही ‘कास-वजराई धबधबा’ असा अनधिकृत फलक कास मंदिराजवळ लावून काही ग्रामस्थ पर्यटकांची फसवणूक करीत आहेत आणि विनापावत्या पैसे लुबाडले जात आहेत.’ (प्रतिनिधी)
कायमची बंदी घाला
जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या अदेशाची पायमल्ली झालेली असल्यानेमुळे कारवाईची गरज आहे. पर्यटकांची दिशाभूल, फसवणूक आणि लुबाडणुकीबद्दल कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करावी. संबंधितांवर भारतीय दंडविधानाच्या कलम ४१५ आणि ४२० अंतर्गत कारवाई करावी. तसेच वन विभागाच्या नोंदीप्रमाणे वजराई धबधबा भांबवली गावच्या हद्दीत येत असल्याने ‘कास-वजराई धबधबा’ हे नाव वापरण्यास कायमची बंदी घालावी, अशा मागण्या ग्रामस्थ मंडळाने केल्या आहेत.