अटल भूजल योजनेचा लाभ घ्या : मल्लिनाथ कलशेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:39 AM2021-03-18T04:39:17+5:302021-03-18T04:39:17+5:30
दहीवडी : ‘संपूर्ण गावाला पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करू शकणाऱ्या अटल भूजल योजनेचा लाभ घ्या’, असे आवाहन भूजल सर्वेक्षण आणि ...
दहीवडी : ‘संपूर्ण गावाला पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करू शकणाऱ्या अटल भूजल योजनेचा लाभ घ्या’, असे आवाहन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा महाराष्ट्राचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.
अटल भूजल योजनेत माणमधील ३२ ग्रामपंचायतींचा (३८ महसुली गावे) समावेश करण्यात आला आहे. या गावांमधील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सदस्य यांची बैठक माण पंचायत समितीच्या बचत भवन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी उपसंचालक पुणे मिलिंद देशपांडे, वरिष्ठ भूवैज्ञानिक टोणपे, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, नामदेव ननावरे, आबा लाड, कनिष्ठ भूवैज्ञानिक गडकरी, संजय साबळे, स्वप्निल अंबुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कलशेट्टी म्हणाले, ‘संपूर्ण गावाची भूजलची पातळी वाढवावी म्हणून या योजनेची निर्मिती करण्यात आली आहे.
भूजल पातळी मोजणे, त्याचा अभ्यास करून भूजल पातळीतील घट-वाढ याचा आलेख दर्शनी भागावर लावणे. जलसुरक्षा आराखडा लोकसहभागातून तयार करणे. जलाशय शोधणे, पाणी पातळी मोजणे, पाण्याचा ताळेबंद, जलसुरक्षा आराखडा तयार करणे ही कामे संबंधित ग्रामपंचायतींनी करायची आहेत. पाणी पातळी वाढविण्यासाठी आवश्यक ते जलसंधारणाचे उपचार करणे. उपलब्ध पाण्याचा काळजीपूर्वक वापर करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.’
नामदेव ननावरे म्हणाले, ‘संपूर्ण गावाचे सर्वेक्षण करून गावाला शाश्वत पाणी मिळावे, ही यातील मुख्य भूमिका आहे. आबा लाड म्हणाले, ‘ग्रामस्थांनी प्रशासनाला सोबत घेऊन ही योजना आपल्या गावात प्रभावीपणे राबवावी.
गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी प्रस्तावना केली. या योजनेत प्रशासन पूर्ण क्षमतेने ग्रामस्थांच्या सोबत असेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
१७दहीवडी
फोटो : दहीवडी येथे अटल भूजल योजनेबाबत मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवर अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.