चाफळ गावात जाण्यासाठी पर्यायी रस्ता करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:23 AM2021-07-23T04:23:33+5:302021-07-23T04:23:33+5:30
चाफळ : येथील श्रीराम मंदिराजवळ उत्तरमांड नदीवर चाफळ गावाला जोडणाऱ्या नवीन फरशी पुलाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. या ...
चाफळ : येथील श्रीराम मंदिराजवळ उत्तरमांड नदीवर चाफळ गावाला जोडणाऱ्या नवीन फरशी पुलाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. या पुलावरून पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी चाफळ गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांनी केली आहे.
चाफळ गावाला जोडणारा जुना ब्रिटीशकालीन पूल धोकादायक बनला आहे. या पुलावरुन ये-जा करताना अनेकजण पाय घसरून पडून जखमी झाले आहेत. नवीन फरशी पुलाचे काम सध्या पावसामुळे बंद असल्याने ही परिस्थिती ओढवली असून, ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष घालून ठेकेदारामार्फत याठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
चाफळ गावातून वाहणाऱ्या उत्तरमांड नदीवर दोन फरशी पूल आहेत. हे पूल गावाला जोडण्यासाठी मुख्य दुवा ठरले आहेत. यातील लहान पूल पाडून त्याठिकाणी एक कोटी रुपये खर्चून नवीन फरशी पुलाचे काम करण्यात येत आहे. मात्र, पावसामुळे गत पंधरा दिवसांपासून ते बंद आहे. सध्या नजीकच असणाऱ्या दुसऱ्या ब्रिटीशकालीन पुरातन पुलाचा उपयोग पर्यायी मार्ग म्हणून ग्रामस्थ करत आहेत. गावात बँक, ग्रामपंचायत, विभागातील बहुतांश विकास सेवा सोसायट्यांची ऑफिसेस, दवाखाने आहेत. त्यामुळे विभागातील ग्रामस्थांची या पर्यायी पुलावर वर्दळ असते. मात्र, या पर्यायी पुलाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने तो केव्हाही पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पुलावरून ये-जा करताना दोन्ही बाजूला चढण्यासाठी व उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्या धोकादायक बनल्या आहेत. अनेक वयोवृद्ध लोक याठिकाणी पडून जखमी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काहींची औषधे, पैसे व साहित्य उत्तरमांड नदीत पडून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदार व ग्रामपंचायत प्रशासनाने ब्रिटीशकालीन पुलाची तात्पुरती डागडुजी करुन याठिकाणी सावधानतेचे सूचना फलक लावून ग्रामस्थांची नवीन पुलावरून पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.
(कोट)
जुना ब्रिटीशकालीन फरशी पूल धोकादायक बनला आहे. दररोज अनेक लोक पडून जखमी होत आहेत. या पुलाची डागडुजी करून स्वच्छता करण्यात यावी, तसेच ज्या नवीन फरशी पुलाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे, त्या फरशी पुलाच्या दोन्ही बाजूला भराव टाकल्यास येथून पादचाऱ्यांना ये-जा करता येऊ शकते. यासाठी ग्रामपंचायत व संबंधित ठेकेदाराने प्रयत्न करावेत.
- पोपट साळुंखे, ग्रामस्थ, चाफळ
फोटो आहे...
२२चाफळ
चाफळ येथील श्रीराम मंदिराजवळ उत्तरमांड नदीवर चाफळ गावाला जोडणाऱ्या नवीन फरशी पुलाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.