किरकसालच्या उरमोडी पाण्यात अंघोळ करा !

By admin | Published: January 14, 2016 11:42 PM2016-01-14T23:42:24+5:302016-01-15T00:15:10+5:30

जयकुमारांचा विरोधकांना टोला : कोकलणारे कुठं गेले ?; माण तालुक्यातील कालव्यात कार्यकर्त्यांसह पाणीपूजन

Take a break from the burlap water! | किरकसालच्या उरमोडी पाण्यात अंघोळ करा !

किरकसालच्या उरमोडी पाण्यात अंघोळ करा !

Next

दहिवडी : ‘आजपर्यंत उरमोडी योजनेची काडीमात्र माहिती नसणाऱ्या, माण-खटावमधील दुष्काळी जनतेविषयी आत्मीयता नसलेल्या रिकामटेकड्यांनी पाणी कुठे आहे? अशी विचारणा करीत जनतेच्या भावनांशी खेळ केला. आज पुन्हा एकदा उरमोडीचे पाणी माणच्या मातीत आणण्यात आम्हाला यश आले आहे. यापुढेही हे पाणी आवर्तनानुसार माण-खटाव तालुक्यांना मिळवून देणार,’असा विश्वास आ. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
उरमोडीच्या पाण्याबाबत उठसूट कोकलणारे आता कुठे आहेत? त्यांनी या पाण्यात एकदा अंघोळ करावीच, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
किरकसाल, ता. माण येथे उरमोडी योजनेच्या पाण्याचे पूजन करताना ते बोलत होते. कार्यक्रमास उरमोडी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता दाभाडकर, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, बाजार समिती सभापती अरुण गोरे, नगराध्यक्ष विजय धट, अर्जुन काळे, विजय सिन्हा, पंचायत समिती सदस्या सुवर्णा पवार, दादासाहेब काळे, सोमनाथ भोसले, राजू पोळ, बाबासाहेब हुलगे, हरिभाऊ जगदाळे, प्रशांत वायदंडे, शिवाजीराव जगदाळे, भानुदास कदम, डी. एस. काळे, अरुण शिंदे, विठ्ठलराव भोसले, बाळासाहेब काटकर, चंद्रकांत खाडे, अ‍ॅड. दत्ता हांगे, दिगंबर राजगे, बाळासाहेब पिसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आ. गोरे म्हणाले, ‘माण-खटावच्या मातीला लागलेला दुष्काळी कलंक पुसण्याचा निश्चय करूनच मी राजकारण-समाजकारणात आलो. पाण्यासाठी टाहो फोडणारी माझ्या मतदार संघातील जनता खूप सहनशील आहे. त्यांच्या सहनशीलतेचा फायदा घेत आजपर्यंत अनेकांनी पाण्याचे फक्त राजकारण केले. मला मात्र माझ्या माण-खटावच्या मातीतून बारामती, फलटण, सांगलीसारखे पाण्याने भरलेले कॅनॉल वाहताना पाहायचे होते. इथल्या स्वाभिमानी जनतेलाही मी तेच स्वप्न दाखविले होते. गेल्या सहा-सात वर्षांत याच स्वप्नपूर्तीसाठी अहोरात्र प्रामाणिकपणे आणि आत्मीयतेने प्रयत्न केले. उरमोडी योजनेसाठी लागणारा निधी आघाडी सरकारच्या काळात मिळविण्यात यश आले. कॅनॉल आणि पंपहाउसची कामे मोठ्या परिश्रमाने मार्गी लावली. पहिल्यांदा आमदार झाल्यावर ‘साडेतीन वर्षांत मतदारसंघात पाणी आणेन,’ असा शब्द मी जनतेला दिला होता. पावणेतीन वर्षांतच उरमोडीचे पाणी खटाव तालुक्यात आणून मी दिलेला शब्द खरा केला होता.
२०११-१२ मध्ये कण्हेर जोड कालव्याची कामे युद्धपातळीवर करून ऐन दुष्काळात सलग २७९ दिवस उरमोडीचे पाणी येरळवाडी तलावात सोडून टंचाईवर मात केली होती. त्यानंतर पंपहाउस एक व दोन येथे नवीन पंप बसवून पूर्ण क्षमतेने पाणी तालुक्यात नेण्यासाठी प्रयत्न केले.
२४ आॅगस्ट २०१४ रोजी उरमोडीचे पाणी पहिल्यांदा माण तालुक्यात पोहोचले. हजारोंच्या जनसमुदायाने मोठ्या आनंदाने माण तालुक्यात प्रथमच आलेल्या पाण्याचे स्वागत केले होते. उरमोडीचे पाणी पूर्ण क्षमतेने येण्यात काही तांत्रिक अडचणी होत्या. कॅनॉल, पोटपोटाची कामे अपूर्ण होती. नवीन पंप बसवायचे होते. भूसंपादनाबाबत अडचणी होत्या. माझे सर्व ताकदीने प्रयत्न सुरू होते.’ (प्रतिनिधी)


पाणी पाहण्यासाठी लोंढे कालव्याकडे...
सुमारे दीड वर्षापूर्वी २४ आॅगस्ट २०१४ रोजी माण तालुक्यातील किरकसालच्या बोगद्यातून पहिल्यांदा उरमोडीचे पाणी तालुक्यात पोहचले होते. त्यादिवशी माण-खटावमधील जनतेने गर्दी करुन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पाणी पूजनाचा सोहळा अनुभवला होता. त्याचपद्धतीने आत्ताही उरमोडी योजनेचे पाणी पुन्हा माण तालुक्यात आले आहे. माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी या पाण्याचे पूजन केले. यावेळी तालुक्यातील विविध पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.


जानेवारी महिन्यात आमच्या भागातून उरमोडीचा कॅनॉल वाहतोय, हे पाहून आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे. दुष्काळावर मात करताना आमची शेतीही पिकणार आहे.
-महादेव अवघडे, शेतकरी किरकसाल

Web Title: Take a break from the burlap water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.