सातारकरांनो आरोग्य सांभाळा; जुलै वाढवू लागलाय ‘ताप’..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:27 AM2021-07-10T04:27:28+5:302021-07-10T04:27:28+5:30
सातारा : पावसाळ्यात कमाल तापमान २५ अंशाच्या खाली येते. पण, मागील काही दिवसांत पावसाची दडी असल्याने जुलै महिन्यातच कमाल ...
सातारा : पावसाळ्यात कमाल तापमान २५ अंशाच्या खाली येते. पण, मागील काही दिवसांत पावसाची दडी असल्याने जुलै महिन्यातच कमाल तापमान ३२ अंशावर गेले. यामुळे पावसाळ्यात उन्हाचा चटका जाणवला. परिणामी बदलत्या हवामानामुळे आरोग्य सांभाळण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात कमाल तापमान ४० अंशाच्या पुढे जाते. २०१९ आणि २०२० या दोन वर्षांचा विचार करता कमाल तापमान ४२ अंशावर पोहोचले होते. पण, यंदा उन्हाळा जाणवलाच नाही. कारण, कमाल तापमानाने एकदाही ४० अंशाचा टप्पा पार केला नाही. त्यातच यावर्षी वेळेवर मान्सूनचा पाऊस सुरू झाला. त्यामुळे कमाल पारा २५ अंशाच्याही खाली आला होता. पण, गेल्या काही दिवसांत पावसाने दडी मारली. त्यामुळे कमाल तापमान वाढत गेले. दुपारच्या सुमारास ऊन पडत होते. तसेच उकाडाही चांगलाच जाणवला. रात्रीच्या वेळी तर पंखे सुरू करुन झोपण्याची वेळ नागरिकांवर आली होती.
हवामान विषयक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पावसात अनेक दिवस खंड पडला. तर अशी स्थिती अनुभवास मिळते. त्यामुळे आताही जुलै महिन्यात कमाल तापमान वाढल्याचे दिसून आले. यामुळे पिकांवरही याचा परिणाम होतो. तसेच वैद्यकीय तज्ञ सांगतात या वातावरणामुळे किरकोळ आजार वाढतात.
चौकट :
सरासरी तापमान ५ अंशाची वाढ...
जुलै महिन्यात चांगला पाऊस होतो. त्यामुळे कमाल तापमान हे २५ अंशापेक्षा कमी राहते. यावर्षी मात्र; २० दिवस पावसाने दडी मारली. वातावरण कोरडे होते. त्यामुळे कमाल तापमान ३२ अंशावर गेले होते. सरासरी ५ अंशाची वाढ झाली.
साताºयातील कमाल तापमाने असे :
दि. २५ जून २७.०३, २६ जून ३०, २७ जून २६.०२, २८ जून ३१.०४, २९ जून ३१.०६, ३० जून ३०.०८, दि. १ जुलै २९.०९, २ जुलै २९.०८, ३ जुलै ३१.०५, ४ जुलै ३२.०४, ५ जुलै ३२.०४, ६ जुलै ३२.०१, दि. ७ जुलै ३२.०२, ८ जुलै ३०.०५ आणि ९ जुलै २७.०६
..................................................
१२ दिवस उनाची तीव्रता...
- जिल्ह्यात जून महिन्याच्या मध्यावर पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाची उघडीप राहिली. जवळपास २० दिवस पावसात खंड होता. त्यामुळे २६ जूनपासून ८ जुलैपर्यंत उनाची तीव्रता जाणवली.
- या १२ दिवसांत सातारा शहरातील कमाल तापमान बहुतांशीवेळा ३० अंशाच्या पुढेच होते. त्यामुळे दुपारच्या सुमारास उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागला.
- मागील दोन दिवसांपासून मान्सूनचा पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे कमाल तापमान कमी होत चालले आहे. सध्या ३० अंशाच्या खाली पारा आहे.
..............................................................
असे नोंद झाले जुलैत तापमान
३२.०४- २०२१
३१.०८-२०२०
३२.०५-१९९९
३३.०५-१९९८
३३.०५-१९९५
३२.०५-१९९३
३२.०५-१९९२
...........................
प्रतिक्रिया...
जून महिन्यात पाऊस झाला. त्यानंतर काही दिवस ढगाळ वातावरण राहिल्यानंतर उन्हाचा चटका वाढला. त्यातच आता ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर पाऊसही पडतोय. त्यामुळे सततच्या हवामान बदलाने सर्दी, तापसारखे आजार होऊ शकतात. नागरिकांनी अशा काळात आरोग्याची काळजी घ्यावी, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
.......................................
हवामानातील बदलामुळे जगातील बहुतेक देशात जुलै महिन्यात उष्णतेच्या लाटा येत आहेत. परंतु, ही स्थिती नेहमीच अशी राहत नाही. महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाने दडी मारल्याने हवेतील उकाड्यात वाढ झाली. त्यामुळे जुलै महिन्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. ही वाढ खरीप पिकांसाठी धोक्याची घंटा आहे. बदलत्या हवामानाचे ते एक निर्देशक आहे.
- प्रा. डॉ. सुभाष कारंडे
..............................................................