सातेवाडीकरांचा आदर्श घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:36 AM2021-05-01T04:36:19+5:302021-05-01T04:36:19+5:30
वडूज : ‘सातेवाडी (ता. खटाव) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून सुरू केलेल्या आयसोलेशन सेंटरचा उपक्रम स्तुत्य असून, सातेवाडीकरांचा आदर्श अन्य ...
वडूज : ‘सातेवाडी (ता. खटाव) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून सुरू केलेल्या आयसोलेशन सेंटरचा उपक्रम स्तुत्य असून, सातेवाडीकरांचा आदर्श अन्य गावांनीही घ्यावा,’ असे आवाहन परिविक्षाधीन प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी केले.
सातेवाडी (ता. खटाव) येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून आयसोलेशन सेंटर सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन परिविक्षाधीन प्रांताधिकारी कासार यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मोरे, उपसरपंच भाऊसाहेब बोटे, पोलीसपाटील विजया माने, गावकामगार तलाठी सुनील सत्रे, तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
वडूज शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर सुमारे १ हजार ६०० लोकसंख्येचे सातेवाडी गाव आहे. या ठिकाणीही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. ऑक्सिजनसाठी ठिकठिकाणी धावाधाव करूनही येथील एका रुग्णाला ऑक्सिजनअभावी जिवाला मुकावे लागले. ही बाब गावकऱ्यांना खटकू लागली. त्यामुळे किमान आपल्या गावातील रुग्णांना तरी वेळेत ऑक्सिजन मिळावा, अशी गावकऱ्यांत चर्चा झाली. गावाच्या सरपंच वृषाली व त्यांचे पती विक्रम रोमन यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. ग्रामस्थांमध्ये चर्चा विनिमय झाल्यानंतर गावातील ग्रामस्थांनीही पाठबळ दिले. त्यानुसार ग्रामस्थांनी आयसोलेशन सेंटरसाठी कॉट, गाद्या, बेडशिट, उश्या, सॅनिटायझर, मास्क आदी साहित्य लोकसहभागातून आणले. येथील जिल्हा परिषद शाळेत आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी पाच ऑक्सिजन बेड व दहा आयसोलेशन बेड उपलब्ध करण्यात आले आहेत.
येथील मयूर बबन बोटे हे मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) याठिकाणी आहेत. गावात आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात येत असल्याचे त्यांना समाजमाध्यमातून समजल्यानंतर त्यांनी त्यास सहकार्य केले. तसेच रोहित सचिन रोमन हे लष्करात सेवेत असणारे जवान गेल्या काही दिवसांपूर्वी सुटीनिमित्त गावी आले आहेत. जवान रोमन यांनीदेखील येथील जिल्हा परिषद शाळेच्या साफसफाई व स्वच्छतेसाठी दोन ते तीन दिवस अव्याहतपणे श्रमदान केले. तसेच गावातील युवकांनीही या श्रमदान मोहिमेत सहभाग नोंदविला. या आयसोलेशन सेंटरचे लोकार्पण करण्यात आले.
कोट..
वाढत्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येमुळे प्रशासन यंत्रणेवर ताण येत आहे, रुग्णांना वेळेत ऑक्सिजन मिळत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे रुग्णांना किमान काही काळापुरता तरी ऑक्सिजन मिळावा, त्यांना जीवनदान मिळावे, यासाठी गावामध्ये ग्रामस्थांच्या सहकार्यातून व लोकसहभागातून आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे.
- वृषाली रोमन, सरपंच
३०वडूज
सातेवाडी (ता. खटाव) येथील ग्रामस्थांनी सुरू केलेल्या आयसोलेशन सेंटर प्रारंभप्रसंगी प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार किरण जमदाडे, सरपंच वृषाली रोमन आदी उपस्थित होते. (छाया : शेखर जाधव )
--------------------
-----------