विकृती दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा : विद्या जाधव
By admin | Published: May 24, 2015 09:53 PM2015-05-24T21:53:35+5:302015-05-25T00:45:50+5:30
पाटण : ग्रामीण रुग्णालयात अरुणा शानभाग यांना श्रध्दांजली
पाटण : ‘महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे समाजातील संवेदनशीलता हरवत चालली आहे. काही विकृत प्रवृत्तींकडून समाजावर अन्याय केला जात आहे. या विकृती दूर करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे,’ असे मत कोयनानगर पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक विद्या जाधव यांनी व्यक्त केले.
मुंबई येथील के.ई.एम. रुग्णालयातील परिचारिका अरुणा शानभाग यांनी ४२ वर्षे मृत्यूशी झुंज देऊन जगाचा निरोप घेतला. त्यांना पाटण येथील ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी ते बोलत होत्या. यावेळी विजयराव थोरवडे, संजय इंगवले, डॉ. प्रल्हाद चव्हाण, डॉ. सी. के. यादव, डॉ. परीट, बाळासाहेब जगताप, काशिनाथ विभूते, किरण पवार, योगेश महाडिक, सुनील महाडिक आदींची उपस्थिती होती.
विजयराव थोरवडे म्हणाले, ‘काही मानसिक विकृतीमुळे निर्भया, शानभागसारख्या घटना घडत आहेत. त्यामुळे समाजाने अशा मानसिक विकृतीना शोधून काढले पाहिजे. आज पन्नास टक्के आरक्षणामुळे महिलांना विविध क्षेत्रांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. असे असताना महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे समाज कुठेतरी मागे पडत असल्याचे दिसत आहे.’ यावेळी अरुणा शानभाग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्स, सेवक व ग्रामस्थांनी श्रद्धांजली अर्पण केली. (प्रतिनिधी)