कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसंबंधी उपाययोजना करा - संजोग कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:28 AM2021-05-28T04:28:45+5:302021-05-28T04:28:45+5:30
सातारा : सातारा जिल्ह्याला आतापर्यंत ७२ हजार ८९० कोव्हॅक्सिन व ६ लाख २९ हजार २७० कोविशिल्ड लस उपलब्ध झालेली ...
सातारा : सातारा जिल्ह्याला आतापर्यंत ७२ हजार ८९० कोव्हॅक्सिन व ६ लाख २९ हजार २७० कोविशिल्ड लस उपलब्ध झालेली आहे. इथून पुढे उपलब्धतेनुसार पुरवठा करण्यात येईल, हे सांगून भविष्यात येऊ घातलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंबंधी घ्यावयाची खबरदारी व करावयाच्या उपाययोजनांबाबत दक्ष राहण्याच्या सूचना आरोग्य उप-संचालक डॉ. संजोग कदम यांनी केल्या.
सातारा येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, सर्व वैद्यकीय अधीक्षक व तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. कदम म्हणाले की, सातारा जिल्ह्यातील डॉक्टरांची ६६ पदे, अधिपरिचारिका यांची २७ पदे, प्रशासकीय विभागातील लिपिकांची वढतीची पदे तसेच तांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरलेली आहेत, तसेच इतरही रिक्त संवर्गातील जागा भरल्याने कोरोना रुग्णांची सेवा देणे सोपे झाले आहे. सध्या रेमडेसिविर इंजेक्शन पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. म्युकरमायकोसिसचे रुग्ण काही प्रमाणात वाढत आहेत. त्यासाठी आवश्यक असणारे इंजेक्शन ( ॲम्पोटेरेसिन बी) जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे. आतापर्यंत जिल्ह्याला ६४० इंजेक्शन प्राप्त झाले आहेत. शासनाच्या निर्देशानुसार लसीकरणाची सत्रे आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.