‘पैसे घ्या, पण पिण्याचे पाणी द्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2020 04:05 PM2020-05-31T16:05:58+5:302020-05-31T16:10:08+5:30
यावर्षी तारळी प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी द्या, पिण्याच्या पाण्यासाठी लागणारे पैसे भरण्याची ही तयारी आहे. मात्र, टँकर नको कॅनालद्वारे पाणी द्या, अशी मागणी धोंडेवाडीसह मानेवाडी, तुपेवाडी, दातेवाडी, दगडवाडी, पळसगाव, कातरखटाव, सूर्याचीवाडी, पिंपरी या
संदीप कुंभार ।
मायणी : सध्या उन्हाची तीव्रता खूप वाढत चालली आहे. त्यामुळे धोंडेवाडीसह नऊ गावांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. या ग्रामस्थांनी तारळी प्रकल्पाचे पिण्याचे पाणी देण्यासाठी ‘पैसे घ्या, पण कॅनालद्वारे पाणी द्या,’ अशी विनंती तारळी व उरमोडी
प्रकल्प अधिकऱ्यांकडे केली आहे.
खटाव तालुक्याचा पूर्व भागाचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी दोन दशकांपूर्वी तारळी उपसा सिंचन योजना या प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, या प्रकल्पाला दोन दशके होऊन गेली तरी या प्रकल्पाचे काम अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे आजही उन्हाळा आला की, या भागातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी शासनाकडे टँकरची मागणी करावी लागत आहे.
यावर्षी तारळी प्रकल्पाचे पाणी पिण्यासाठी द्या, पिण्याच्या पाण्यासाठी लागणारे पैसे भरण्याची ही तयारी आहे. मात्र, टँकर नको कॅनालद्वारे पाणी द्या, अशी मागणी धोंडेवाडीसह मानेवाडी, तुपेवाडी, दातेवाडी, दगडवाडी, पळसगाव, कातरखटाव, सूर्याचीवाडी, पिंपरी या नऊ गावांनी तारळी व उरमोडी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे केली आहे.
खटाव व माण तालुक्यांतील एकूण आठ हजार ८७६ हेक्टर इतक्या अवर्षणप्रवण क्षेत्राला सिंचनाचा लाभ तारळी प्रकल्पामुळे मिळणार आहे. त्यासाठी आजवर चारवेळा प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. या मान्यतेमुळे प्रकल्पांतर्गत रखडलेले भूसंपादन, पुनर्वसन व २६ किलोमीटर कालव्याचे काम पूर्ण झाले. खटाव पूर्वभागात इतकाच दुष्काळी भाग हा माण तालुक्यातील आहे.
या माण तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी १४ मे पासून पाणी दिले जात आहे. मात्र, तेव्हापासून खटाव पूर्व भागाला पाणी द्यावे, अशी मागणी या नऊ गावांतील ग्रामस्थ करीत असताना सुद्धा याकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे.
नऊ गावांतील ग्रामस्थांनी अनेकवेळा तारळी प्रकल्प अधिकारी उरमोडी प्रकल्प अधिकाºयांच्या कार्यालयात हेलपाटे घातले आहेत. संबंधित अधिका-यांकडून अनेकवेळा त्यांना सकारात्मक उत्तर मिळत असले तरी कारवाई मात्र आजपर्यंत झालेली नाही. त्यामुळे नक्की या उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी मिळणार की नाही, हा मात्र प्रश्न सध्यातरी मागे लागताना दिसत नाही. उन्हाळ्यात शेती केली जात नाही. त्यामुळे फक्त पिण्याच्या पाण्याची गरज आहे. या भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू नाहीत. यामुळे शासनाचा यावर्षीचा खर्चही वाचला आहे. सध्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे.
काम अजून अपूर्ण
धोंडेवाडीसह गावातील कॅनॉलचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, याच प्रकल्पाअंतर्गत असलेल्या अनफळे, मोराळे, मायणी व मरडवाक या गावांचा परिसरातील कॅनॉलची कामे अजून अपूर्ण आहेत. तर काही ठिकाणी काम सुरूही झाले नाही. त्यामुळे हे काम केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
या वर्षी शेतकऱ्यांनी पाण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून पैसे भरण्याची तयारी केली. मात्र, अधिकाºयांनी पुढील सूचनेअभावी हे पैसे असूनही पैसे भरायचे तरी कोठे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन संपल्यावर अधिकार यांच्याविरुद्ध तीव्र आंदोलन उभे करून त्यांना तालुका बंदी केली जाईल.
- हणमंत भोसले,
उपसरपंच, धोंडेवाडी, तालुका खटाव
तारळी प्रकल्प व उरमोडी प्रकल्प विभागातील दोन्ही अधिकाऱ्यांचे एकमेकांशी समन्वय नाही. त्यामुळे दोन्ही विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. यामुळे नेमके पाणी यावर्षी तरी देणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
- रामचंद्र घोलप, सामाजिक कार्यकर्ते