दोन दिवसांत जागा ताब्यात द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:42 AM2021-05-06T04:42:09+5:302021-05-06T04:42:09+5:30
सातारा : साताऱ्यातील सदाशिव पेठेत गेल्या अनेक वर्षांपासून कोणताही करार न करता सुरू असलेल्या संबंधित पेट्रोल पंप चालकांना पालिका ...
सातारा : साताऱ्यातील सदाशिव पेठेत गेल्या अनेक वर्षांपासून कोणताही करार न करता सुरू असलेल्या संबंधित पेट्रोल पंप चालकांना पालिका प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. पंपाची जागा दोन दिवसांत पालिकेच्या ताब्यात द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा या नोटिसीद्वारे मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे.
सदाशिव पेठेतील जागा सातारा पालिकेच्या मालकीची आहे. गेल्या वीस वर्षांपासून या जागेत दोन पेट्रोल पंप सुरू आहेत. पालिकेने पंप चालकांना ही जागा तीन वर्षांच्या भाडे करारावर दिली होती. करार संपल्यानंतर त्याचे नूतनीकरण करणे गरजेचे होते. मात्र, २०१० नंतर दोन्ही पंप चालकांनी कराराचे नूतनीकरणच केले नाही. त्यामुळे २०१७ रोजी पालिका प्रशासनाने संबंधितांना जागा पालिकेच्या ताब्यात देण्याबाबत नोटीस बजावली होती. मात्र, त्यानंतर आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.
दरम्यान, याबाबत ‘लोकमत’मध्ये ‘साताऱ्यातील दोन पंप कराराविनाच सुरू’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. याची दखल घेत पालिका मुख्याधिकाऱ्यांनी दोन्ही पेट्रोल पंप चालकांना तातडीचे नोटीस बजावली. पेट्रोल पंप शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत. हा परिसर गर्दीने नेहमीच गजबजलेला असतो. स्फोटक पदार्थामुळे जर काही अनुचित प्रकार घडला, तर त्याला नगरपालिका कदापी जबाबदार राहणार नाही. संबंधितांनी ४८ तासांच्या आत जागा पालिकेच्या ताब्यात द्यावी, अन्यथा पालिकेला स्वत:हून जागा ताब्यात घ्यावी लागेल. यासाठी येणारा सर्व खर्च पंप चालकांकडून वसूल केला जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
(चौकट)
इतकी वर्षे प्रशासन शांत का?
पालिका प्रशासनाच्या नोंदीनुसार दोन्ही पेट्रोल पंप चालकांचा करार २०१० रोजी संपुष्टात आला आहे. म्हणजेच करार संपुष्टात येऊन आज दहा वर्षे होऊन गेली. इतक्या प्रदीर्घ कालावधीत पालिका प्रशासनाने केवळ एकदाच नोटीस बजावण्यापलीकडे कोणतीही ठोस कारवाई केली नाही. यावरूनच प्रशासनाचा कारभार किती सक्षमपणे सुरू आहे, याची प्रचिती येते. याप्रकरणी तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी केल्यास पडद्याआड घडलेल्या अनेक घडामोडी उजेडात येऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचे धारिष्ट्य दाखविणे गरजेचे आहे.
लोगो : लोकमत फॉलोअप