नवमतदार नोंदणीचा टक्का वाढविण्यासाठी विशेष परिश्रम घ्या, साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश
By प्रगती पाटील | Updated: February 1, 2024 17:50 IST2024-02-01T17:50:01+5:302024-02-01T17:50:36+5:30
निवडणूक विषयक पूर्व तयारीचा घेतला आढावा

नवमतदार नोंदणीचा टक्का वाढविण्यासाठी विशेष परिश्रम घ्या, साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश
सातारा : नवमतदारांची नोंदणी मोठ्या प्रमाणावर करणे आवश्यक असून त्यासाठी महाविद्यालयांचे प्राचार्य, सरपंच, बीएलओ यांची मदत घ्यावी. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांवर लक्ष केंद्रित करावे, नवमतदार नोंदणीचा टक्का वाढविण्यासाठी दैनंदिन पाठपुरावा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणूक विषयक पूर्व तयारीचा आढावा सर्व नोडल अधिकारी, प्रांताधिकारी यांच्याकडून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीस अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, प्रोबेशनरी आएएस अधिकारी चंद्रा, उप जिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, सहायक आयुक्त समाजकल्याण नितीन उबाळे, सातारा प्रांताधिकारी सुधाकर भोसले, उपजिल्हाधिकारी विजया यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे व निलेश घुले, निवडणूक ना. तहसिलदार अनिल जाधव यांच्यासह विविध यंत्रणांचे नोडल अधिकारी उपस्थित होते. तर कराड, फलटण, माण-खटाव, कोरेगाव, पाटण आणि वाईचे प्रातांधिकारी दुरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी डुडी यांनी निवडणूक विषयक कामकाजाचा सविस्तर आढावा घेवून १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांच्या नोंदणीसाठी सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घ्यावे, असे निर्देशित केले. यावेळी त्यांनी प्राप्त झालेल्या ईपिक कार्डांचे १०० टक्के वितरण झाले पाहिजे, निवडणूकीशी संबंधित सर्व यंत्रणांचे प्रशिक्षण पूर्ण करावे, ट्रेनिंग मटेरियल, विविध प्रकाराचे निवडणूक विषयक मार्गदर्शक साहित्य संबंधित यंत्रणांना पोहोच होतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देशित केले.
शॅडो एरियामध्ये संवाद यंत्रणेची आवश्यक तजवीज ठेवावी. मतदार जनजागृती करून मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्विप कार्यक्रम मोठ्या प्रमाणावार राबवावा. इव्हीएम व्हीव्हीपॅट याबाबतच्या जनजागृतीसाठीचे कार्यक्रम ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावार नागरिक जमा होतील अशा ठिकाणी आयोजित करण्यात यावे असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
२० फेब्रुवारीपर्यंत यंत्रणा अपडेट ठेवा
जिल्ह्यातील एकूण मतदान केद्रांपैकी किमान ५० टक्के मतदान केंद्र वेबकास्टिंग करण्यात येणार आहेत. विविध निकषांवर आधारित अशी त्यासाठी यादी उपविभागीय अधिकाऱ्यांनी तयार करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या आहेत. राजकीय पक्षांची बैठक घेवून त्यामध्ये या यादीबाबत माहिती द्यावी. राजकीय पक्षांनी सुचविलेले मतदान केंद्रही त्यामध्ये समाविष्ट करावे. व्हल्नरॅब्लीटी मॅपींग करण्यात यावे. संवेदनशिल मतदान केद्रांची यादी तयार करावी. ज्या मतदान केद्रांच्या ठिकाणी रॅम्प, स्वच्छतागृह यासारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध नसतील अथवा नादुरुस्त असतील त्या ठिकाणी २० फेब्रुवारीपर्यंत त्यांची पुर्तता करण्याच्याही सुचना देण्यात आल्या आहेत.