मास्क नसणाऱ्यांवर कडक कारवाई करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:58 AM2021-02-23T04:58:04+5:302021-02-23T04:58:04+5:30
शंभूराज देसाई : पाटणला आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना पाटण : राज्यामध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ ...
शंभूराज देसाई : पाटणला आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
पाटण : राज्यामध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. याचा प्रसार ग्रामीण भागात होऊ नये, यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडल्यानंतर मास्क वापरणे गरजेचे आहे. तालुका प्रशासनाने मुख्यत: पोलीस विभागाने नागरिकांना मास्क वापरण्याची सक्ती करावी. मास्क नाही वापरले तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
दौलतनगर, ता. पाटण येथे मतदार संघातील तालुकास्तरीय सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. तहसीलदार योगेश टोपे, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. बी. पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चंद्रकांत यादव, पोलीस निरीक्षक निंगाप्पा चौखंडे, उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, ढेबेवाडीचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, मल्हारपेठचे सहायक पोलीस निरीक्षक अजित पाटील, सी. एस. माळी आदींची उपस्थिती होती.
या बैठकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी मतदार संघातील कोरोना रुग्णांच्या संदर्भात आढावा घेतला. जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. यासंदर्भात जिल्हास्तरीय सर्व संबंधित अधिकाऱ्यांची दोनच दिवसांपूर्वी मी बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. सध्या वातारणामध्येही अचानक बदल झाल्याने सर्दी, खोकला व ताप अशी लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढू लागले आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांनी निष्काळजीपणे न वागता त्यांनी तत्काळ आवश्यक त्या तपासण्या करण्याच्या सूचना कराव्यात. कोरोनाचा प्रसार परत होऊ नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने मास्क वापरणे सक्तीचे करावे. त्याचबरोबर कोरोना चाचण्याही वाढवाव्यात. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये, याकरिता तालुका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी गावागावांमध्ये शासकीय यंत्रणेमार्फत जनजागृती करण्याचे काम सुरू करावे. आरोग्य सेवक, ग्रामसेवक, तलाठी, मंडलाधिकारी, पोलीस पाटील यांच्यामार्फत गावागावांत जाऊन दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात याव्यात, अशी सूचनाही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.
- चौकट
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सतर्क राहा!
सध्या विवाह समारंभ मोठ्या प्रमाणात होत आहेत. परवानगी घेऊन हे समारंभ होत असले तरी प्रशासनाने खबरदारी घ्यावी. तसेच बाजारपेठांमध्ये गर्दी होऊन अशा ठिकाणी कोठेही नियमांचे उल्लंघन होऊ नये, याचीही काळजी यंत्रणेकडून घेण्यात यावी. गर्दीवर नियंत्रण ठेवत कोरोनावर मात करण्याचे आवाहन शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात यावे, अशी सूचना शंभूराज देसाई यांनी केली.
फोटो : २२केआरडी०२
कॅप्शन : दौलतनगर, ता. पाटण येथे आयोजित आढावा बैठकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.