कोरोनामुक्त होण्यासाठी कडक उपाययोजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:38 AM2021-04-17T04:38:25+5:302021-04-17T04:38:25+5:30
खंडाळा : ‘लोकप्रतिनिधींनी निवडणुकीसारखे काम कोरोनाकाळात गावात करणे गरजेचे असून, गावात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण असताना नियम ...
खंडाळा : ‘लोकप्रतिनिधींनी निवडणुकीसारखे काम कोरोनाकाळात गावात करणे गरजेचे असून, गावात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण असताना नियम पाळा हे सांगायला लागणे लाजीरवाणे आहे. गावातील सर्वांनी शासकीय नियम पाळून गावकऱ्यांनी गाव कोरोनामुक्त करण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात,’ असे प्रतिपादन खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे यांनी केले.
अंदोरी (ता. खंडाळा) गावात आजवर एकूण ७३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यापैकी ४५ रुग्ण बरे झाले आहेत तर २७ रुग्ण ॲक्टिव्ह असून, २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावामध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य यांनी गावात बैठक घेऊन ग्रामस्थ व आपत्ती व्यवस्थापन समितीस मार्गदर्शन केले, यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य दीपाली साळुंखे, गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, डॉ. प्रशांत बागडे, सरपंच प्रदीप होळकर, उपसरपंच छाया हाडंबर, श्यामराव धायगुडे, नानासो ननावरे, डॉ. नानासो हाडंबर, दत्तात्रय धायगुडे, संजय जाधव, सदस्य किसन ननावरे, बाळासो होवाळ, संध्या खुंटे, नर्मदा कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. अविनाश पाटील म्हणाले, ‘‘गावात कोरोनाला रोखण्यासाठी कडक उपाययोजना करून मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे, सर्व गाव कंटेन्मेट झोन करून त्याचे पालन करा, त्रास होणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थाने तपासणी करून घ्या.’’
यावेळी दीपाली साळुंखे म्हणाल्या, ‘‘कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे असून, सर्वांनी शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे, तसेच ४५ वर्षांवरील सर्व ग्रामस्थांनी लस घ्यावी.’’
१६खंडाळा
फोटो : अंदोरी(ता. खंडाळा) येथे कोरोनाबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये उपस्थिताना तहसीलदार दशरथ काळे यांनी मार्गदर्शन केले.