गणेशोत्सवात मिठाई जपूनच घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 07:54 PM2017-08-24T19:54:35+5:302017-08-24T20:37:43+5:30
दुधासह दुग्धजन्य पदार्थामध्ये होणाºया भेसळीमुळे चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. गणेशोत्सव काळात तयार खव्याचे मोदक, पेढे, बर्फी आणि खाद्यपदार्थ व मिठाईमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न औषध प्रशासनाने भेसळ खोरांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी होत आहे.
रहिमतपूर : गणेशोत्सवात शहरी भागासह ग्रामीण भागातही मिठाईला मागणी वाढते. स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारा खवा पुरेसा नसल्याने शेजारील राज्यातून खव्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. वाढलेल्या मागणीचा गैरफायदा घेऊन भेसळीच्या माध्यमातून भेसळखोर आपले उखळ पांढरे करतात. मात्र, भेसळीच्या मिठाईमुळे सर्वसामान्य जनतेचे आरोग्य धोक्यात येत आहे. भेसळीच्या खाद्यपदार्थांपासून आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी पेढे, बर्फी आदी खरेदी करताना दर्जा तपासूनच खरेदी करणे गरजेचे झाले आहे.
सणासुदीच्या काळात मिठाईला मागणी वाढत असल्याने मिठाईतील विविध पदार्थांमध्ये भेसळीची दाट शक्यता निर्माण होते. रहिमतपूर शहरासह जिल्हाभर स्थानिक पातळीवर मर्यादित स्वरूपाचा खवा तयार होतो. मात्र, जिल्ह्यातील स्वीटमार्ट दुकानांची आकडेवारी पाहता हा खवा पुरेसा ठरत नाही. सणासुदीच्या कालावधी व्यतिरिक्तही जिल्ह्याबाहेरील राज्यातून खाण्याची आवक होते. मात्र, गणेशोत्सवात खव्याच्या आवकमध्ये दुप्पटीपेक्षा जास्त वाढ होते. वाढती मागणी पुरविण्यासाठी या काळात बाहेरच्या राज्यातून भेसळीचा खवा पाठविला जातो. दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान अन्न व औषध प्रशासनाकडून झालेल्या कारवाईतून हे स्पष्ट झाले आहे. या भेसळीमध्ये केवळ परराज्यातील नव्हे तर जिल्ह्यातील काही लहान-मोठ्या व्यापाºयांचा सहभाग आहे. जिल्ह्यातील अनेक नामवंत स्वीटमार्टवर भेसळ प्रकरणी यापूर्वी कारवाई झाली आहे. त्यामुळे धुतल्या तांदळासारखा मी आहे, असा कोण बडेजाव मारताना दिसत नाही. लहान-मोठे विक्रेते भेसळ करत नसले तरी त्यांना खव्यासह इतर मिठाईची उत्पादने पुरवठा करणाºयांचे काय? असा प्रश्न निर्माण होतो.
दुधासह दुग्धजन्य पदार्थामध्ये होणाºया भेसळीमुळे चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. गणेशोत्सव काळात तयार खव्याचे मोदक, पेढे, बर्फी आणि खाद्यपदार्थ व मिठाईमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न औषध प्रशासनाने भेसळ खोरांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी होत आहे.