टाळ-मृदंगाचा ताल; मुखी माउलींचा गजर
By admin | Published: July 6, 2016 11:27 PM2016-07-06T23:27:50+5:302016-07-07T00:51:09+5:30
तरुणाईची संख्या वाढली : वारीमुळे अवघा रंग एक झाला
दशरथ ननावरे-- खंडाळा: आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरीच्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी विविध जाती धर्माचे आबालवृद्ध माउलींच्या वारीमध्ये सामील झाले आहेत. टाळ-मृदंगाच्या तालात मुखी केवळ माउलींचा गजर करीत तल्लीन झालेले पाहायला मिळतात. यामध्ये तरुणांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे माउलींच्या वारीत अवघा रंग एक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
एक तरी वारी अनुभवावी ‘असं म्हटलं जातं,’ सर्वधर्म समभावाची शिकवण देणारी हीच वारी आयुष्यात विधायक विचारांना प्रवृत्त करीत असते. त्यामुळे अलीकडच्या काळात तरुण वर्गाचा वारीतील उत्साह वाखाणण्याजोगा आहे. वृक्षारोपण काळाची गरज, व्यसनमुक्ती, मुलींचे शिक्षण, गर्भलिंग चाचणी, स्त्री-भ्रूणहत्या, पर्यावरण रक्षण आणि इतरही सामाजिक ज्वलंत प्रश्नांवर प्रबोधन करीत तरुण वारकरी वारीमध्ये अनोखा संदेश देत असतात.
एकदा वारीचा अनुभव घेतला की दरवर्षी वारीचा मोह आवरताच येत नाही. वारीच्या मार्गावर बीजारोपण करणे या उपक्रमातून काहींनी माउलींची सेवा जोपासली आहे. तर पालखी मार्गावर रांगोळी घालण्याच्या कामात देव शोधण्याचा प्रयत्न केला जातो. पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या, डॉक्टरेट मिळविलेल्या तरुण-तरुणींच्या सहभागाने वर्षानुवर्षे वारी तरुण होत असल्याचे पाहायला मिळते. सांसारिक सुख-दु:ख बाजूला सारून वारीमध्ये आत्मिक समाधान शोधण्याचा तरुणांचा प्रयत्न असतो. त्यासाठी सामाजिक उपक्रमांचा आधार घेऊन वारकऱ्यांची सेवा केली जातेय.