हल्लेखोरांच्या निषेधार्थ फलटणमध्ये तलाठी, कोतवाल संघटनेचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 05:41 PM2017-11-02T17:41:35+5:302017-11-02T17:49:22+5:30
अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना मोक्का लावल्याशिवाय काम करणार नसल्याचा इशारा तलाठी व कोतवाल संघटनेने दिला आहे. संघटनेने कामबंद आंदोलन सुरू केले असून, शिवसेनेने ही त्यांना पाठिंबा दिला आहे. वाळू सम्राटांवर मोक्का लावण्याची मागणी केली आहे.
फलटण ,दि. ०२ : अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना मोक्का लावल्याशिवाय काम करणार नसल्याचा इशारा तलाठी व कोतवाल संघटनेने दिला आहे.
मागील काही दिवस महसूल कर्मचारी व कोतवाल यांच्यावर अवैध वाळू उपसा करणारे लोक बेधडक हल्ले करत असूनही या लोकांवरती काहीच ठोस उपाययोजना होत नसल्याने व हल्ले वाढतच चालल्याने तलाठी संघटना व कोतवाल संघटना यांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून, या बाबतचे निवेदन प्रांत व तहसीलदार यांना दिले.
गेली दोन ते तीन वर्षे तलाठी यांच्यावर प्राणघातक हल्ले सुरू असून, शासन याबाबत कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याने या अवैध व्यावसायिकांचे वागणे सुधारत नसल्याने त्यांना मोक्का लावण्यास का टाळाटाळ होत आहे? असा प्रश्न तलाठी व कोतवाल यांनी केला आहे. आता कामबंद आंदोलन सुरू केले असून, शिवसेनेने ही त्यांना पाठिंबा दिला आहे. वाळू सम्राटांवर मोक्का लावण्याची मागणी केली आहे.