तलाठी, ^‘भूमिअभिलेख’ला टाळे लोकमत न्यूज नेटवर्क
By admin | Published: June 7, 2017 12:05 AM2017-06-07T00:05:49+5:302017-06-07T00:05:49+5:30
तलाठी, ^‘भूमिअभिलेख’ला टाळे लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : वडूज (ता. खटाव) येथे आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांनी गनिमी कावा करत येथील तलाठी कार्यालय तसेच भूमीअभिलेख कार्यालयास टाळे ठोकले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले. यावेळी तहसीलदार यांच्या दालनाला कडक पोलीस पहारा ठेवण्यात आला होता.
शेतकऱ्याचा सातबारा कोरा व्हावा तसेच शेतीमालाला हमीभाव मिळावा, शेतीसाठी अखंडित वीजपुरवठा व्हावा यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी एक जूनपासून आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी वडूज परिसरात शंभर टक्के बंद ठेवून व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. आंदोलनाची तीव्रता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी शासकीय कार्यालयाला टाळे ठोक आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहत वडूजच्या तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता. त्यामुळे आंदोलनकर्त्यांची कोंडी झाली होती. परंतु पोलीस प्रशासनाला गुंगारा देत तलाठी कार्यालयाला दुपारी दोनच्या सुमारास टाळे ठोकण्यात आले. त्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयास शेतकऱ्यांनी बाहेरहून कड्या लावल्या. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. शेतकऱ्यांनी आक्रमक होत शासनाविरोधी घोषणा दिल्या. त्यानंतर आंदोलक निघून गेले.
शेतकऱ्यांचा नागरी सत्कार होणार !
वडूजमध्ये तलाठी व तालुका भूमिअभिलेख कार्यालयास गनिमी कावा करून टाळे ठोकणाऱ्या जिगरबाज शेतकऱ्यांचा जाहीर नागरी सत्कार कर्जमाफीनंतर करणार असल्याचे संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे व वडूज नगरसेवक शहाजीराजे गोडसे यांनी सांगितले.