निर्जीव भिंती ‘मेकिंग सातारा’ ग्रुपने केल्या बोलक्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:36 AM2021-02-14T04:36:58+5:302021-02-14T04:36:58+5:30

आपला सातारा स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी आपणही काहीतरी केले पाहिजे, असे शुभम भोसले, नेहा शिरकांडे, गायत्री शिंदे यांना वाटले. ...

Talk about making lifeless walls with 'Making Satara' group! | निर्जीव भिंती ‘मेकिंग सातारा’ ग्रुपने केल्या बोलक्या!

निर्जीव भिंती ‘मेकिंग सातारा’ ग्रुपने केल्या बोलक्या!

Next

आपला सातारा स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी आपणही काहीतरी केले पाहिजे, असे शुभम भोसले, नेहा शिरकांडे, गायत्री शिंदे यांना वाटले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मेकिंग सातारा ग्रुपची संकल्पना त्यांच्या चर्चेतून पुढे आली. हळूहळू सदस्य वाढत जाऊन शंभरावर पोहोचले. या ग्रुपने पहिले काम हाती घेतले ते शहरातील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या भिंती आकर्षक करण्याचे. रस्त्याने जाता-येता आपण भकास भिंती पाहत असतो. त्यावेळी काहीजण अशा भिंतीलगत कचरा टाकतात. त्यामुळे आणखीच या भिंतीबरोबरच शहराच्या सौंदर्यालाही बाधा येत होती. हळूहळू या ग्रुपने पदरमोड करत शहरातील भिंती आकर्षक करण्याचे काम हाती घेतले. साताऱ्यात येणाऱ्या पर्यटकांना शहर स्वच्छ आणि रंगीबेरंगी पाहायला मिळावं, यासाठी मेकिंग सातारा ग्रुप रस्त्यावरील भिंती बोलक्या करू लागला आहे.

शहरातील स्मारके, प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक इमारती यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी सातारा पालिकेच्या माध्यमातून या ग्रुपचे प्रयत्न सुरू आहेत. नुकतीच या ग्रुपने जम्बो कोविड हॉस्पिटलमधील डायनिंग हॉलची भिंत अत्यंत आकर्षक केली. हे पाहून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीही या ग्रुपचे कौतुक केले. या ग्रुपमधील प्रत्येकाने वेगवेगळी जबाबदारी स्वीकारली आहे. मेजरमेंट, डिझाइन टीम, एक्झिबिशन, कलर कॉम अशा स्वतंत्र टीम तयार करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या टीमने शहरातील १२ भिंती बोलक्या केल्या आहेत. या अनोख्या संकल्पनेला सातारकरांमधूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सदर बझारमधील सुमित्राराजे उद्यानची भिंत वेगवेगळ्या चित्रांनी आकर्षक दिसत आहे. या ग्रुपची महती अल्पावधीतच महाराष्ट्रभर पसरली आहे. अनेकांकडून त्यांना भिंतीवर रंगीबेरंगी चित्र काढण्यासाठी बोलावण्यात येत आहे. सातारा शहराला सुंदर करत असतानाच अन्य ठिकाणीही त्यांची दखल घेतली जात आहे. अशा प्रकारच्या शहरातील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या भिंती रंगवून यंदाचा व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याचा या ग्रुपने संकल्प केला आहे.

-दत्ता यादव

Web Title: Talk about making lifeless walls with 'Making Satara' group!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.