तमाशा कलावंत, वगनाट्यकार रामचंद्र बनसोडे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 09:30 PM2018-01-31T21:30:40+5:302018-01-31T21:30:46+5:30

जिवंत आणि रांगड्या अभिनयातून तांबव्याचा विष्णू बाळा आणि बापू बिरू वाटेगावकर यांसारखी अनेक वगनाट्ये अजरामर करणारे ज्येष्ठ तमाशा कलावंत, लेखक, वगनाट्यकार रामचंद्र लक्ष्मण बनसोडे  उर्फ आर. एल. बनसोडे (वर 75) यांचे बुधवारी करवडी ता. कराड येथे दिर्घ आजाराने निधन झाले.

Tamasha artist, classmate Ram Chandra Bansode passes away | तमाशा कलावंत, वगनाट्यकार रामचंद्र बनसोडे यांचे निधन

तमाशा कलावंत, वगनाट्यकार रामचंद्र बनसोडे यांचे निधन

googlenewsNext

कराड : जिवंत आणि रांगड्या अभिनयातून तांबव्याचा विष्णू बाळा आणि बापू बिरू वाटेगावकर यांसारखी अनेक वगनाट्ये अजरामर करणारे ज्येष्ठ तमाशा कलावंत, लेखक, वगनाट्यकार रामचंद्र लक्ष्मण बनसोडे  उर्फ आर. एल. बनसोडे (वर 75) यांचे बुधवारी करवडी ता. कराड येथे दीर्घ आजाराने निधन झाले. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे करवडीकर यांचे ते पती होत.

करवडी (ता. कराड) येथील रामचंद्र लक्ष्मण बनसोडे यांनी त्यांच्या पत्नी मंगला बनसोडे यांच्या बरोबरीने 1980 च्या दशकात तमाशा फडाची उभारणी करून श्रीगणेशा केला होता. विठाबाई भाऊ मांग नारारणगावकर यांची कन्या असलेल्या  मंगला बनसोडे यांच्या जोडीने हा तमाशा अल्पावधीतच लोकप्रिय  झाला तो रामचंद्र बनसोडे यांच्या सत्य घटनेवर आधारीत आणि धार्मिक, ऐतिहासिक वगनाट्यामुळे. 

1984 च्या दरम्यान रामचंद्र बनसोडे यांनी स्वतंत्र तमाशा काढल्यानंतर बनसोडे यांनी लेखन केलेल्या वगनाट्याच्या जोरावरच हा तमाशा राज्यभर नावाजला गेला. कृष्णा काठचा फरारी, जन्मठेप कुंकवाची, भक्त प्रल्हाद, येथे नांदते मराठेशाही, बाळू मामाची मेंढरं, वहिणी आमची मायेची या वगनाट्यांचे त्यांनी लेखन केले. सत्य  घटनेवर आधारीत वगनाट्य ही मंगला बनसोडे तमाशा मंडळाची खासियत होती. रामचंद्र बनसोडे यांनी बापू बिरू वाटेगावकर, तांबव्याचा विष्णू बाळा, कारगिलच्या  युद्ध ज्वाला,  हर्षद मेहता, राजीव गांधी हत्याकांड, देव चोरला जेजुरीचा, अनिल डोंबे खून खटला या सत्य घटनेवर आधारीत वगनाट्यांचे लेखन केले होते. ही वगनाट्ये राज्यभर गाजली. सत्य घटनेवर आधारीत लेखनामुळे त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले होते. तमाशा फडावर हल्ला, कनाती पेटवणे आणि धमकी या सर्व अडचणींना तोंड देत बनसोडे यांनी तमाशा कलेची सेवा सुरूच ठेवली होती. 
तांबव्याचा विष्णू बाळा आणि बापू बिरू वाटेगावकर या वगनाट्याने राज्यभर गर्दीचा उच्चांक गाठला. तमाशा रसिक फक्त ही वगनाट्ये पाहण्यासाठी येत असत. बापू बिरू वाटेगावकर वगनाट्याचे लेखन करण्यासाठी रामचंद्र बनसोडे यांनी राज्य शासनाची परवानगी घेवून तुरूंगात वाटेगावकर सोबत चार दिवस मुक्काम केला होता.

विष्णू बाळाचे लेखन करण्यासाठी बनसोडे हे तांबवे येथे आण्णा बाळा यांच्या घरी अनेक दिवस मुक्कामी होते. मुलगा नितीन बनसोडे यांना तमाशा फडावर आणण्यासाठी त्यांनी भक्त प्रल्हाद या नाटकाचे लेखन केले होते. कृष्णा काठचा फरारी, तांबव्याचा विष्णू बाळा, बापू बिरू वाटेगावकर या वगनाट्यातील त्यांचा अभिनयाला तमाशा रसिकांनी मोठी दाद दिली होती. गेले काही दिवस रामचंद्र बनसोडे हे आजारपणामुळे अंथरूणावर होते. त्यांच्यावर कराड, मिरज, पुणे येथे उपचारही करण्यात आले. बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. या दरम्यान मंगला बनसोडे आणि नितीन बनसोडे अहमदनगर येथे तमाशा कार्यक्रम करत होते. दरम्यान रामचंद्र बनसोडे यांच्या पश्चात पत्नी मंगला बनसोडे, मुलगा अनिल व नितीन, मुलगी लक्ष्मी, तसेच सुना, नातवंडे असा परिवार आहे. रामचंद्र बनसोडे यांच्या पार्थिवावर करवडी येथे गुरूवारी सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Web Title: Tamasha artist, classmate Ram Chandra Bansode passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.