'तमाशा ही जिवंत कला : बनसोडे
By admin | Published: March 9, 2015 09:39 PM2015-03-09T21:39:29+5:302015-03-09T23:48:55+5:30
येथे ज्येष्ठ तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार व जिल्ह्यातील वीस विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांना ‘यशवंत गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित
कऱ्हाड : ‘तमाशा ही जिवंत कला आहे. या कलेला कमी समजू नका. स्त्रियांनी देखील ही जिवंत कला पाहिली पाहिजे. मी तमाशा कलेची सेवा गेली ५५ वर्षे करीत असून, माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ही या कलेची सेवा करीत राहीन. माझा सन्मान देशासह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात झाला. मात्र कऱ्हाडच्या मातीतील या गौरवामुळे आयुष्याचे सार्थक झाले,’ असे भावोद्गार ज्येष्ठ तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडे यांनी काढले. येथे ज्येष्ठ तमाशासम्राज्ञी मंगला बनसोडे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार व जिल्ह्यातील वीस विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांना ‘यशवंत गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिजामाता महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा अॅड. वर्षा माडगूळकर, नगराध्यक्षा अॅड. विद्याराणी साळुंखे, पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, प्रा. अशोक चव्हाण, कृष्णा फाउंडेशनचे प्राचार्य विनोद बाबर, गोरख तावरे, विकास भोसले, स्वाती भोसले यांची उपस्थिती होती.
यावेळी लक्ष्मी कऱ्हाडकर, नांदगावच्या इंदू कुचेकर, बनवडीच्या शोभा कुलकर्णी, विद्यानगरच्या शकिला नायकवडी, मांडवेच्या सुजाता पवार, कालेच्या प्रगती पिसाळ, कऱ्हाडच्या अपर्णा गिजरे, उद्योजक उज्ज्वला कदम, विद्या मोरे, विजया शिंदे, प्रज्ञा वरेकर, कोरेगावच्या विमल नलावडे, रेठरे बुद्रुकच्या सरिता पवेकर, कऱ्हाडच्या प्रतिभा राजे, मुस्कान तांबोळी, पाटणच्या विद्या म्हासुर्णेकर, नागझरीच्या मनीषा मुळीक, रेश्मा पवार आदींंना ‘यशवंत गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विकास साळुंखे, विनायक मोरे, सागर दंडवते व चंद्रकांत भोसले यांनी स्वागत केले. विकास भोसले यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण भंडारे व रत्नाकर शानभाग यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)