तमाशावरून दोन गावात ‘तमाशा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 01:05 AM2017-11-07T01:05:47+5:302017-11-07T01:06:48+5:30

Tamasha in two villages on Tamasha | तमाशावरून दोन गावात ‘तमाशा’

तमाशावरून दोन गावात ‘तमाशा’

Next


ढेबेवाडी : तमाशात झालेल्या बाचाबाचीवरून दोन गावांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. अडीचशेपेक्षा जास्त जणांच्या जमावाने एकमेकांवर तुफान दगडफेक करीत घरांमध्ये घुसून महिला, मुलांसह पाहुण्यांनाही मारहाण केली. तसेच साहित्याचीही तोडफोड करण्यात आली. कुंभारगाव-चाळकेवाडी (ता. पाटण) येथे सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. यात तीन पोलिसांसह वीसहून जास्तजण जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या तसेच घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कुंभारगावच्या लक्ष्मीदेवी यात्रेचा रविवारी मुख्य दिवस होता. यात्रेनिमित्त पूर्वसंध्येला शनिवारी रात्री तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. तमाशावेळी काही युवकांनी नृत्यांगनांना खडे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी युवकांमध्ये बाचाबाची झाली. यात्रेचा मुख्य दिवस रविवारी होता. दिवसभर यात्रा सुरळीत पार पडली. मात्र, सायंकाळी काही युवकांमध्ये पुन्हा हमरीतुमरी झाली. यावेळी ग्रामस्थांनी मध्यस्थी करीत वादावर तात्पुरता पडदा टाकला. तसेच याबाबतची फिर्याद ढेबेवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी दोन्ही गटांतील युवकांवर अदखलपात्र गुन्हाही नोंद केला.
दरम्यान, सोमवारी सकाळी कुंभारगाव व चाळकेवाडी या दोन गावांना जोडणाºया मुख्य रस्त्यावर युवक आमने-सामने आले. त्यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला. यावेळी दोन्ही ाावांतील सुमारे अडीचशेपेक्षा जास्तजणांचा जमाव त्याठिकाणी जमला. जमावाने एकमेकांवर तुफान दगडफेक करीत मिळेल त्या वस्तूंनी मारहाण करण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाच्या दगडफेकीत पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील, सहायक फौजदार राजेंद्र अंकुशी, हवालदार एस. एस. नाफड हे जखमी झाले.
मारामारी सुरू असताना युवकांचा जमाव कुंभारगावात घुसला. युवकांनी काही घरांमध्ये घुसून तेथील साहित्यांची तोडफोड करीत महिला, मुले व यात्रेसाठी आलेल्या पाहुण्यांनाही बेदम मारहाण केली. या दगडफेक व मारामारीत वीसहून अधिकजण जखमी झाले. त्यांच्यावर ढेबेवाडीतील ग्रामीण रुग्णालयत तसेच कºहाडच्या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. या घटनेमुळे दोन्ही गावांत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Web Title: Tamasha in two villages on Tamasha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा