‘तांबं’ चोरांचं ‘एक डीपीतपितळ’ उघडं!
By Admin | Published: December 9, 2015 01:03 AM2015-12-09T01:03:29+5:302015-12-09T01:03:29+5:30
चाळीस हजारांचा ऐवज : वीज कंपनीची डोकेदुखी तर शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
राहुल तांबोळी ल्ल भुर्इंज
एका डिपी चोरीतून तब्बल ४० हजार रुपये एवढी घसघशीत रक्कम मिळत असल्याने चोरट्यांनी डीपी चोरीकडे मोर्चा वळवला आहे. डिपीमधील १०० किलोहून अधिक किलोच्या तांब्याच्या तारेच्या हव्यासापोटी धोका पत्करुन डीपींची चोरी होत असून चोरीतील हे तांबे ४०० रुपये किलोने भंगारात विकले जात आहे. ज्या ठिकाणी डीपीची चोरी होते त्या ठिकाणी नविन डीपी बसवण्यास क्लिष्ट प्रक्रियेमुळे मोठा कालावधी खर्ची पडत असल्याने वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढण्यासोबत शेतकऱ्यांचेही प्रचंड नुकसान होत आहे. दरम्यान, सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेने ट्रान्सफॉर्मरमधून तांब्याची तार चोरणाऱ्या टोळीचा छडा लावून चौघांना अटक केली आहे. यामुळे तांबं चोरांच पितळ आता उघडं पडलं आहे.
वीज वितरण कंपनीतर्फे २५ केव्ही, ६३ केव्ही, १०० केव्ही आणि २०० केव्हीचे डीपी बसवले जातात. यातील २५ केव्ही हे छोट्या वाडी वस्तीवर तर २०० केव्ही डीपी हे मोठ्या गावात व शहरात बसवले जातात. त्यामुळे हे डीपी फोडून त्यातील तांबे चोरणे चोरट्यांना शक्य होत नाही. शेतीसाठी ६३ केव्ही आणि १०० केव्हीचे बसवले जाणारे डीपी आडबाजूला शेतात असतात त्यामुळे चोरट्यांकडून या डीपींना लक्ष केले जाते. या डीपींवरुन तब्बल २२ केव्ही क्षमतेचा वीज पुरवठा वाहणारी तार असते. त्याची जोडणी या डीपीला असते. त्यामुळे डीपी फोडणे धोकादायक आहे. मात्र पैशाच्या हव्यासापोटी चोरटे तो धोका पत्करुन हे डीपी फोडत आहेत.
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या चोरीच्या घटनांमुळे वीज वितरण कंपनीची डोकेदुखी वाढत आहेच याशिवाय शेतकऱ्यांचेही प्रचंड नुकसान होत आहे. कारण एका ६३ केव्हीच्या डीपीवर ४० ते ५० आणि एका १०० केव्ही डीपीवर ६५ ते ८० वीजपंप जोडणी दिलेली असते. डीपी नादुरुस्त झाला तर साधारण ८ ते १५ दिवसांत दुरुस्ती करुन तो डीपी पुर्ववत सुरु केला जातो. मात्र डीपी फोडून त्यातील तांब्याची तार चोरी झाल्यानंतर मात्र पोलिस तक्रार, वरिष्ठ कार्यालयाला त्याची माहिती कळवणे त्यानंतर नविन डीपीची मंजुरी मिळणे आदी सर्व प्रक्रियेमध्ये प्रचंड वेळ जातो. त्यामुळे चोरीझालेल्या ठिकाणी नविन डीपी बसण्यास दोन महिन्यांहून अधिक कालावधी लागत असल्याची माहिती शेतकऱ्यांकडून दिली जात आहे. या कालावधीत पाण्याअभावी पिके अक्षरश वाळून जात असून समोर पाणी असूनही वीज जोडणीअभावी ते पिकांना देता येत नाही.
डीपी चोरीची तक्रार झाल्यानंतर तपास लागण्यास मोठा कालावधी लागतो. चोरटे जो डीपी फोडतात त्याचे संपूर्ण नुकसान होते त्यामुळे चोरीच्या ठिकाणी नविन डीपी बसवण्याशिवाय पर्याय राहत नाही. नविन डीपीला मंजूरी मिळण्याची प्रक्रिया अनेकदा दिरंगाईच्या फटक्यात अडकते. त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष स्थानिक वीज कंपनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो. प्रत्येक डीपीच्या ठिकाणी २४ तास सुरक्षा व्यवस्था ठेवणेही अशक्य आहे.
एखादा डीपी नादुरुस्त झाला तर तो आम्ही जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर दुरुस्त करुन शेतकऱ्यांची गैरसोय दूर करु शकतो. मात्र चोरीनंतर संबंधित ठिकाणी नवा डीपी बसवण्यास एक महिन्याचा कालावधी लागत आहे. पोलिस तक्रार, वरिष्ठ कार्यालयाला याबाबतची माहिती देणे, नवा डीपी मंजूर करुन घेणे व तो बसवणे ही प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असते त्यामुळे तो कालावधी लागत असून डीपी चोरट्यांवर वचक बसणे, या चोऱ्यांना आळा बसणे अतिशय गरजेचे आहे.
- ए. एस. खुस्पे, उप कार्यकारी अभियंता, वाई.
एका डीपीत १०० किलो तार
६३ केव्हीच्या डीपीमध्ये १०४ किलो वजनाची तांब्याची तार असते तर १०० केव्हीच्या डीपीमध्ये १२८ किलो वजनाची तांब्याची तार असते. सध्या नविन तांब्याच्या तारेचा दर हा प्रतिकिलोस ६०० रुपये आहे तर भंगारात हीच तांब्याची तार ४०० रुपये प्रतिकिलोने विकली जाते. एका डीपीतून १०० किलोहून अधिक तांबे मिळत असल्याने चोरट्यांना एका चोरीतून ४० हजारापेक्षा अधिक कमाई होत आहे. एवढ्या मोठ्या रकमेच्या हव्यासापोटीच चोरटे प्रसंगी धोका पत्करुन शेतातील डीपी फोडून तांबे चोरत आहेत.