पाणी टंचाईवेळी टँकर आला धावून, ढेबेवाडीत उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 03:59 PM2020-11-21T15:59:19+5:302020-11-21T16:00:45+5:30
water shortage, sataranews ढेबेवाडी, ता. पाटण येथे पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील विद्युत पंप नादुरुस्त झाल्याने चार दिवस पाणी टंचाई निर्माण झाली होती. ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. अशावेळी येथील जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करून ग्रामस्थांना दिलासा दिला.
ढेबेवाडी : ढेबेवाडी, ता. पाटण येथे पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील विद्युत पंप नादुरुस्त झाल्याने चार दिवस पाणी टंचाई निर्माण झाली होती. ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. अशावेळी येथील जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करून ग्रामस्थांना दिलासा दिला.
ढेबेवाडी हे या विभागातील मध्यवर्ती बाजारपेठेचे ठिकाण आहे. याठिकाणी विभागातील पन्नास ते साठ गावे आणि वाडी-वस्तीतील ग्रामस्थांची मोठी वर्दळ असते. बाजारपेठेच्या या गावामधील राजकारण अनेक वर्षे पाणीप्रश्नावर रंगलेले दिसून येत आहे. या गावातील पहिली पाणी पुरवठा योजना १९७२ मध्ये कार्यान्वित झाली होती.
पस्तीस ते चाळीस वर्षे या योजनेवर ग्रामस्थांना अवलंबून राहावे लागत होते. कालबाह्य झालेल्या योजनेमुळे पाण्यासाठी नेहमीच वणवण करावी लागत होती. अखेर २००९ मध्ये येथे भारत निर्माण योजना नव्याने राबवण्यात आली. ही पाणीपुरवठा योजनाही अनेक वर्षे वादाच्या भोवऱ्यात सापडली. सध्या या योजनेद्वारे गावाला पाणी पुरवठा केला जातो.
गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर भोसगावच्या शिवारामध्ये दक्षिण वांग नदीच्या काठावर आहे. सध्या वांग-मराठवाडी धरणातील पाणीसाठ्यामुळे या परिसरात बारमाही पाणी असते. परिणामी, ढेबेवाडीची योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे. मात्र विहिरीतील दोन वीज पंप अचानक नादुरुस्त झाल्याने सलग चार दिवस पाणीपुरवठा खंडित झाला.
ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला. ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांच्या सहकार्याने नादुरुस्त झालेले पंप विहिरीतून काढून कऱ्हाडला दुरुस्तीसाठी पाठवले. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर शुक्रवारी ते पंप पुन्हा विहिरीत बसविण्यात आले.
ग्रामस्थांना मिळाला दिलासा
गावात पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर ढेबेवाडीतील ग्रामस्थांनी व ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांच्याशी संपर्क साधला. ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेत रमेश पाटील यांनी तातडीने पाण्याचा टँकर पाठवून टंचाईच्या काळात ग्रामस्थांना दिलासा दिला.