टँकरने पाणी देऊन जगवली झाडे । दुष्काळाचा सामना करण्यासाठी एक पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 09:30 PM2019-12-07T21:30:26+5:302019-12-07T21:32:17+5:30
आता पावसाने दीड महिन्यापासून उघडीप दिल्याने भांगलण करून मातीची भर देऊन टँकरने पाणी घातल्याने झाडे हिरवीगार दिसत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सूर्यकांत निंबाळकर ।
आदर्की : भयानक दुष्काळाचे चटके सोसत असताना निम्मे गाव पाणी टंचाईमुळे बाहेर पडले. त्याचा विचार करून ग्रामपंचायतीने त्याची कारणे शोधून वृक्षारोपणाचा निर्णय घेतला. मात्र जुलै महिन्यात पावसाने पाठ फिरवली. तरीही एक हजार खड्डे खोदून विविध प्रकारची झाडे लावून टँकरद्वारे पाणी घालून गाव हिरवेगार करण्याचा ध्यास टाकोबाईचीवाडीचे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने घेतला आहे.
टाकोबाईचीवाडीचे सरपंच विशाल झणझणे यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायतीने पाच वर्षांमध्ये ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ उपक्रमातून शेकडो हेक्टरवर समतल चर खोदली. पावसाचे पडणारे पाणी जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कृषी विभाग, कमिन्स कंपनी व श्रमदानातून पाच-सहा सिमेंट बंधारे बांधले. काही दुरुस्त करून त्यामधील गाळ काढला. त्यामध्ये पाणीसाठा झाला. बंधाऱ्यात पाणीसाठा झाल्यामुळे भूगर्भातील पाणीसाठा वाढला. त्यामुळे भयानक दुष्काळात पाणी टंचाई कमी प्रमाणात भासली.
जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असताना ग्रामपंचायतीने जेसीबीच्या सा'ाने काळुबाई मंदिरापर्यंत खड्डे खोदले. मुरमाड व खडकाळ जमीन असल्याने एक हजारपैकी शंभर खड्डे भूसुरुंगद्वारे काढण्यात आले. त्यामध्ये बंधाºयातील गाळ भरून त्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे.
गाव पाणीदार तसाच.. हिरवागारही होणार
टाकोबाईचीवाडी गाव मुरबाड व खडकावर वसले आहे. येथे दुष्काळ पाचवीला पुजलेला आहे. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी अर्र्धा गाव शहरात गेले आहे. धोम-बलकवडी पाणी, ओढाजोड प्रकल्पामुळे गाव हिरवेगार झाले आहे. पण झाडांची संख्या कमी असल्याने दहा वर्षांपासून ग्रामस्थांनी झाडे लावली आहेत. टाकोबाईचीवाडीच्या झाडाला तारक ठरला. झाडांची वाढ पाच महिन्यांत चार-पाच फुटांपर्यंत झाली आहे. आता पावसाने दीड महिन्यापासून उघडीप दिल्याने भांगलण करून मातीची भर देऊन टँकरने पाणी घातल्याने झाडे हिरवीगार दिसत आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गाव दुष्काळी छायेत असताना सावली बचत गटाने दहा वर्षांपूर्वी जनावरांची छावणी सुरू केली होती. तेव्हा झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित करून छावणीच्या ठिकाणी वृक्ष लागवड केली होती.
- विलासराव झणझणे, माजी सरपंच, टाकोबाईचीवाडी