वानरवाडी,बामणवाडीला टँकरने पाणीपुरवठा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:39 AM2021-04-22T04:39:49+5:302021-04-22T04:39:49+5:30
प्रमोद सुकरे कराड कराड तालुक्याला सध्या उन्हाळ्याच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. अनेक गावात शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण ...
प्रमोद सुकरे
कराड
कराड तालुक्याला सध्या उन्हाळ्याच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. अनेक गावात शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर वानरवाडी ,बामणवाडी या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत गेल्यास आणखी काही गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागणार आहे .
कृष्णा- कोयना नदी काठावर वसलेला कराड तालुका खरं तर सधन म्हणून ओळखला जातो. पण भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर तालुक्यातील काही भागात पाणी टंचाई जाणवते. शेतीच्या पाण्यासाठी या दोन्ही नदीतून उपसा जलसिंचन योजना राबविल्याने बराचसा भाग ओलिताखाली आला आहे. त्यामुळे सामान्य शेतकऱ्याच्या घरात समृद्धी निर्माण झाल्याचे दिसते.
मात्र कराड दक्षिण मध्ये उंडाळे खोऱ्यातील डोंगरी भाग, ढेबेवाडी खोऱ्यातील काही गावे यांना पाणी टंचाई भासते. कराड उत्तर मधील काही गावांनाही टंचाईचा सामना करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यात १ एप्रिल ते ३० जून अखेरचा कालावधी गृहीत धरुन तालुक्यातील २७ गावांचा समावेश केलेला दिसतो. तर यापूर्वी १ जानेवारी ते ३१ मार्च अखेर साठी केलेल्या आराखड्यात २७ गावांचा समावेश होता.
दरम्यान पंचायत समितीने पाणीटंचाईच्या अनुषंगाने योग्य पावले उचलली आहेत. टंचाई भासणाऱ्या गावांचा आढावा घेऊन त्याचा आराखडा तयार केला आहे. लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.
चौकट
या गावांचा आहे समावेश ..
बामणवाडी ,पवारवाडी(नां), गोसावेवाडी ,खोडजाईवाडी, घोलपवाडी, गायकवाडवाडी, बानुगडेवाडी, अंतवडी, काले टेक, किवळ, वडोली भिकेश्वर, रिसवड ,शिवडे, कोरिवळे, डफळवाडी, नांदलापूर, सुरली, कामती ,संजयनगर ,तासवडे, वानरवाडी या गावांचा टंचाईच्या यादीत समावेश आहे.
चौकट
काय केले आहे नियोजन ..
नवीन विंधन विहिरी- ५
नळ पाणीपुरवठा दुरुस्ती -३
तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना - ३
टँकरने पाणीपुरवठा- १०
खाजगी विहीर अधिग्रहण -५
विहीर खोदणे, गाळ काढणे- १६
चौकट
वाकुर्डेच्या पाण्याने मिळतो दिलासा ..
कराड दक्षिणच्या उंडाळे खोऱ्यात, डोंगरी भागात पाणी टंचाई भासते. यावर पर्याय म्हणून वाकुर्डे योजनेचे माध्यमातून वारणा नदीचे पाणी दक्षिण मांड नदी पात्रात सोडले जाते. माजी मंत्री विलासराव पाटील यांच्या प्रयत्नातून देशातील पहिला नदीजोड प्रकल्प येथे साकारला गेला आहे . यावर्षीही नुकतेच वाकुर्डे योजनेतून या नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असून ते पाणी शेवटपर्यंत पोचल्यानंतर शेती व पिण्याच्या पाण्याकरिता या भागाला दिलासा मिळणार आहे.
कोट
तालुक्याच्या पाणीटंचाईचा आराखडा तयार आहे. सध्या वानरवाडी व बामणवाडी येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यानुसार दोन्ही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढली तर अजून काही गावांना पाण्याचे टँकर सुरू करावे लागतील. त्याची दक्षता आम्ही घेत आहोत.
डॉ. आबासाहेब पवार
गटविकास अधिकारी
पंचायत समिती कराड