कारवाईच्या धास्तीने स्वतःच हटविला टपऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:40 AM2021-03-17T04:40:13+5:302021-03-17T04:40:13+5:30
सातारा : गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसराने अखेर मोकळा श्वास घेतला. सातारा पालिकेच्या अतिक्रमण ...
सातारा : गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसराने अखेर मोकळा श्वास घेतला. सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने सलग दुसऱ्यादिवशी या ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबवून चार टपऱ्या जप्त केल्या. तर कारवाईच्या धास्तीने काहीजणांनी स्वतःहूनच आपली अतिक्रमणे काढून घेतली.
उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात चहा, खाद्यपदार्थांचे गाडे व टपऱ्यांचे साम्राज्य वाढले आहे. या टपऱ्या वाहतुकीला अडथळा ठरू लागल्या आहेत. पालिकेकडून कारवाई करण्यात आली, तरी काही दिवसानंतर पुन्हा आहे त्याच जागेवर टपर्या उभ्या केल्या जातात. त्यामुळे अतिक्रमण विभागाने येथील कारवाई मोहीम अधिकच तीव्र केली आहे.
सोमवारी अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांच्या पथकाने एकूण बारा टपऱ्या जप्त केल्या. उर्वरित टपऱ्या हटविण्यासाठी अतिक्रमण विभागाचे पथक मंगळवारी सकाळी सर्व यंत्रणेसह उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात दाखल झाले. कारवाईच्या धास्तीने काहीजणांनी स्वतःहूनच आपली अतिक्रमणे काढून घेतली, टपऱ्या हटवल्या, तर पथकाकडून चार टपऱ्या जप्त करण्यात आल्या. अतिक्रमण विभागाने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील अतिक्रमणाचा विषय गांभीर्याने घेत हा परिसर वाहतुकीसाठी मोकळा केला. आता शहरातील प्रमुख रस्ते, चौक, पालिकेचे भूखंड, राजवाडा परिसर, राजपथ व पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर थाटण्यात आलेल्या टपऱ्या हटविण्याचे धाडसही दाखवावे, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
फोटो : १६ अतिक्रमण
सातारा पालिकेच्या अतिक्रमण पथकाने मंगळवारी सकाळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातील हातगाड्या व टपऱ्या जप्त केल्या.