निधीला ‘डांबर’... रस्त्यावर ‘पाणी’
By admin | Published: February 13, 2015 08:56 PM2015-02-13T20:56:03+5:302015-02-13T22:59:27+5:30
पाटबंधारे खात्याचे दुर्लक्ष : वाई-पसरणी रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण रखडले
वाई : वाई-पसरणी रस्त्याचे रुंदीकरण, नवीन ९० लाखांच्या निधीचे डांबरीकरण, वाई पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे व चाल ढकलीमुळे होणाऱ्या पाण्याच्या गळतीमुळे पुन्हा खराब होण्याची परिस्थिती निर्माण झाली असून, पसरणी ग्रामस्थांकडून व प्रवाशांकडून पाटबंधारे विभागाच्या या कारभाराबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे.पसरणी ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे वाई-पसरणी रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या पूर्वीही अनेकवेळा या रस्त्यासाठी लाखोंचा निधी खर्च झाला आहे. यावेळी ९० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. रस्त्याचे काम सुरू असून, नाल्याची कामे बाकी आहेत. वाई-पसरणी रोडवर धोम धरणाच्या कालव्याचे शेती पाण्यासाठी दोन ठिकाणी पाट आहेत. हे रस्त्याच्या खालून जातात. त्याचे बांधकाम अतिशय जुने झाले असून, कालव्यातून पाणी सुटल्यानंतर त्यातून पाण्याची मोठी गळती होते. त्यामुळे या रस्त्याचे काम होऊन टिकत नाही. डांबर निघून जाऊन सतत मोठ-मोठे खड्डे पडतात. यावेळी रस्त्याचे काम चालू होण्यापूर्वी पसरणी येथील माजी सरपंच व कार्यकर्त्यांनी वाई-सातारा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून व पाणी गळती ठिकाणी नेहून परिस्थिती दाखविली होती. याबाबत अनेकवेळा निवेदनेही दिली गेली आहेत. यावर पाटबंधारे विभागाकडून त्या पाण्याच्या धाऱ्यावर थोडेसे काम केले आहे. कालव्याचे पाणी सुटल्यानंतर पुन्हा त्यातून पाणी गळती होऊन रस्ता खराब होत आहे. नवीन डांबरीकरणही पाण्यात जाण्याची धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या या कामकाजाबाबत ग्रामस्थ व प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
वाई पसरणी रस्त्यासाठी यावेळी ९० लाखांचा निधी उपलब्ध झाला असून, कालव्याच्या शेतीपाण्याच्या गळतीमुळे यापूर्वीही गेली अनेक वर्षे रस्ता खराब होत आहे. संबंधित वाईचे पाटबंधारे विभागाचे अधिकारी चंदकांत सणस तसेच सातारा विभागाचे बी. बी. मोरे यांना प्रत्यक्ष ठिकाणी नेहून परिस्थिती दाखवली आहे. परंतु त्यांनी केवळ किरकोळ जुन्या कामाला डागडुजी केल्याने पुन्हा गळती सुरू झाली आहे. त्यामुळे रस्त्याचे काम खराब होणार आहे.
- राजेंद्र शिर्के, माजी सरपंच, पसरणी
धोम धरणाच्या कालव्यातून येणाऱ्या शेतीसाठी पाण्याच्या दाऱ्याची कामे कालवे निर्मितीच्यावेळी ४० वर्षांपूर्वी झाली आहेत. त्याची नवीनच बांधकामे होण्याची गरज असून, यासाठी गळतीमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे व रस्ता वारंवार खराब होत आहे.
- वामनराव खरात, शेतकरी