तरडगावची कोरोनामुक्तीकडे वाटचाल..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:49 AM2021-06-09T04:49:23+5:302021-06-09T04:49:23+5:30
तरडगाव : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात गावोगावी विलगीकरण कक्ष उभारली गेले. कित्येक ठिकाणी लोकसहभागाचे पाठबळ यामागे उभे राहत ...
तरडगाव : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात गावोगावी विलगीकरण कक्ष उभारली गेले. कित्येक ठिकाणी लोकसहभागाचे पाठबळ यामागे उभे राहत आहे. काही दिवसांपूर्वी चांदोबाचा लिंब तरडगाव (ता. फलटण) येथे उभारलेल्या कोरोना विलगीकरण कक्षास अनेक मंडळी आर्थिक मदत करीत आहेत. यामुळे बाधित रुग्णांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होताना दिसत आहे. आतापर्यंत ३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यातून गावची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे.
गतवर्षी तालुक्यातील तरडगाव येथे पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. तर या वर्षीही गावात कोरोनाचा कहर झाला होता. वाड्या-वस्त्यासह प्रत्येक वार्डात दररोज येणाऱ्या आकडेवारीने धडकी भरत होती. कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या या गावात यायचं म्हटलं तरी ‘नको रे बाबा’ असे आजूबाजूच्या गावची मंडळी म्हणत असत. मात्र सततच्या गावबंदीमुळे आजअखेर येथील बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आटोक्यात आली आहे.
गत महिन्यात उभारलेल्या येथील विलगीकरण कक्षासाठी मोठे आर्थिक सहकार्य लाभत आहे. आतापर्यंत लाखोंची मदत झाली आहे. याकामी तरडगाव विकास सोसायटी, भैरवनाथ विकास सोसायटी सासवड, माजी सभापती वसंतराव गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य दत्ता अनपट, उपसभापती रेखा खरात, सुभाष गायकवाड, सुरेश अडसूळ, दत्तात्रय कुलाळ, संजय गाढवे, संदीप गायकवाड, महेंद्र गायकवाड, कृष्णात गायकवाड, दादासाहेब धायगुडे, धनेश कानडे आदींनी आर्थिक मदत केली आहे.
गावचे पदाधिकारी हे कक्षात येऊन बाधितांसाठी मदत करत आहेत. विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते कक्षाला हातभार लावत आहेत. सरपंच जयश्री चव्हाण, उपसरपंच प्रदीप गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य, विविध पदाधिकारी कार्यरत आहेत. मदतीचा ओघ हा असाच कायम राहावा, यासाठी आवाहन केले जात आहे.
(चौकट )
८८ वर्षीय योद्ध्याची कोरोनावर मात..
विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेले काळज येथील ८८ वर्षीय महादेव खंडू गायकवाड हे सोमवारी कोरोनामुक्त झाले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद लपत नव्हता. चांगली सेवा मिळाल्याबद्दल सर्वांचा निरोप घेताना प्रशासनासह कक्षासाठी राबणाऱ्या प्रत्येक घटकाचे त्यांनी कौतुक केले.
कोट..
गेल्या सात दिवसांत कोरोना रुग्णांचे प्रमाण घटले आहे. केवळ एक बाधित रुग्ण आढळून आला आहे. ही बाब गावच्या दृष्टीने चांगली आहे. कक्षातील ३६ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. सध्या १६ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असून लवकरच त्यांचा कार्यकाल संपेल.
- दादासाहेब धायगुडे, ग्रामविकास अधिकारी, तरडगाव
०७तरडगाव
तरडगाव विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या काळज (ता. फलटण) येथील महादेव गायकवाड या वृद्धाने कोरोनावर मात केल्यावर त्यांना उपस्थित पदाधिकऱ्यांनी निरोप दिला.