अंगापूर तर्फ तारगावची निवडणूक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:54 AM2021-01-02T04:54:55+5:302021-01-02T04:54:55+5:30
अंगापूर : सातारा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील व जागृत असणाऱ्या अंगापूर तर्फ तारगावची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्याच्यादृष्टीने ग्रामस्थ ...
अंगापूर : सातारा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील व जागृत असणाऱ्या अंगापूर तर्फ तारगावची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्याच्यादृष्टीने ग्रामस्थ व प्रमुख कार्यकर्त्यांनी एकमुखी निर्णय घेतला आहे.
ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्यपदासाठी नऊ महिलांची निवड केली असून, सर्व महिलांचे अर्ज छाननीत वैध ठरले आहेत. त्यादृष्टीने गावाची वाटचाल सुरू आहे. गावाच्या कारभारात महिलाराज येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार महिलाच पाहणार आहेत, हे आता स्पष्ट झाले आहे. गावाच्या या ऐतिहासिक निर्णयांचे परिसरातून कौतुक होत आहे.
सहा महिन्यांपासून गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या तयारीसाठी गटा-तटाचे राजकारण सुरू होते. यावरून ही निवडणूक मोठी चुरशीची होईल असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र निवडणुका जाहीर होताच सूज्ञ ग्रामस्थांनी बैठकीच्या माध्यमातून गावपातळीवरील निवडणुकीतून राजकीय ईर्षेपायी होणाऱ्या परिणामांची माहिती दिली.
वाडा, भावकी, आळी, घरा-घरात नव्हे, तर सख्खे भाऊ यांच्यात वितुष्ट निर्माण होते. त्याबरोबर निवडणुकीतून होणारा वारेमाप खर्च या सर्व बाबींचा संदर्भ दिला. यामुळे याचादूरगामी परिणाम सामान्य नागरिकांवर होतो. यासाठी गावातील लोकांतील संघर्ष कमी करून गावच्या विकासासाठी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करण्याची साद घातली. याला प्रतिसाद देत गावातील मान्यवर, ज्येष्ठ मंडळी, ग्रामस्थ, तरुण, युवकांनी ही निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश येऊन सदस्यसंख्या असणाऱ्या फक्त नऊ महिलांचे अर्ज भरण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे निवडणूक बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे गावाने सलग दुसरी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध केली आहे.
चौकट
गावाने ठरविलेली आचारसंहिता
ग्रामस्थांनीच पाच वर्षांसाठी आचारसंहिता निश्चित केली आहे. यामध्ये सरपंचाची निवड चिठ्ठीद्वारे होईल. ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य महिला राहतील. नऊ सदस्यांपैकी एका सदस्याची राजकीय भूमिका तटस्थ राहणार आहे. गावाबाहेरील निवडणुकीसाठी प्रत्येक ग्रामस्थाला स्वातंत्र्य असेल. मात्र गावपातळीवरील एकी अबाधित ठेवणे गरजेचे आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य गावचा प्रतिनिधी असेल. त्यांचे हे पद राजकीय पक्ष, अथवा नेत्यांच्या नेतृत्वाखालील नसेल. गावात कोणताही राजकीय फ्लेक्स लागणार नाही. गावाला विकास निधी उपलब्ध करून देणाऱ्या लोकप्रतिनिधीचा फ्लेक्स असेल, परंतु त्यावर स्थानिक नेते, पदाधिकारी यांचा फोटो नसेल. सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींकडून निधी मिळविण्यासाठी ग्रामपंचायत पूर्ण सहकार्य करेल. गावात कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी आल्यास सरपंच, उपसरपंच यांनी उपस्थित राहणे सक्तीचे असेल.