रसिकांसमोर तिजोरीने जोडले ‘कर’
By admin | Published: February 13, 2015 12:03 AM2015-02-13T00:03:37+5:302015-02-13T00:51:35+5:30
महसुलात घट : करमाफीच्या शासकीय निर्णयामुळे चित्रपगृह चालकांना दिलासा
सातारा : शासन महसूल वाढीसाठी वेगवेगळ्या तजविजा करत असले तरी चित्रपटगृहांना कर माफीचा निर्णय घेतला गेल्याने शासनाला महसूली तोट्याला सामोरे जावे लागत आहे. सातारा जिल्ह्यात हा निर्णय घेण्याआधी जानेवारी २0१४ अखेर ७९ लाख ७३ हजार रुपयांचा महसूल जमा झाला होता. करमाफीच्या निर्णयानंतर जानेवारी २0१५ अखेर अवघा ५६ लाख ५३ हजार इतका करमणूक कर तिजोरीत जमा झाला आहे.शासन विविध घटकांच्या माध्यमातून करमणूक कर वसूल करते. चित्रपटगृहांकडूनही करमणूक कर वसूल केला जात होता. मात्र, गेल्या सप्टेंबरमध्ये शासनाने चित्रपटगृहांना करमणूक करमाफीचा अद्यादेश जाहीर केला. या निर्णयामुळे चित्रपटगृहांचा करमणूक कर माफ झाला आहे. सातारा जिल्ह्यात एकूण १५ चित्रपगृह आहेत. यापैकी सातारा शहरातील ३, कऱ्हाड शहरातील २, फलटण शहरातील १, रहिमतपूर १, कोरेगाव १, वडूज २, उंब्रज १ व मलकापूर १ अशा एकूण १२ चित्रपगृहांनी करमणूक कर माफीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सविस्तर अर्ज केले होते. त्याचा फायदा त्यांना झाला. ही चित्रपगृहे करमणूक करातून वगळण्यात आली आहेत.
करमणुकीची साधने वाढली असल्याने चित्रपगृहे ओस पडत असल्याची ओरड केली जात होती. काही दिवसांपूर्वी तशी परिस्थितीही होती. या मंदीच्या कालावधीत शहरातील अनेक चित्रपगृहे बंद पडली. त्यातील काही चित्रपगृह मालकांनी चक्क अपार्टमेंटची बांधकामे करुन जागेचा पैसा केला. त्यातूनही जे काही मोजके व्यावसायिक होते. त्यांनी चित्रपटगृहांच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेतले. यातून डबल स्क्रिन करुन दोन-दोन चित्रपट दाखविण्यात यश आले.
जिल्हा प्रशासनाला एप्रिल २0१३ ते मार्च २0१४ या कालावधीत ८९ लाख ३३ हजार ८६२ रुपयांचा महसूल मिळाला होता. करमाफीच्या निर्णयामुळे या महसुलात घट झाली आहे. मार्चअखेर त्याचा परिणाम दिसून येणार आहे. (प्रतिनिधी)
या चित्रपगृहांना फायदा
राधिका, राजलक्ष्मी, समर्थ (सातारा), प्रभात स्क्रिन १, स्क्रिन २ (कऱ्हाड), नामवैभव (फलटण), दिग्विजय (रहिमतपूर), दौलत (कोरेगाव), अलंकार, मनिष (वडूज), शुभम (उंब्रज), नटराज (मलकापूर) या चित्रपगृहांना करमणूक कर माफीचा फायदा झाला आहे.