तीन महिन्यांमध्ये सातारा जिल्हयात शिक्षक भरती - पालकमंत्री शंभूराज देसाई
By प्रगती पाटील | Published: October 7, 2023 05:20 PM2023-10-07T17:20:14+5:302023-10-07T17:20:52+5:30
जिल्हयातील २२ गुणवंत शिक्षकांचा सत्कार
सातारा : समाजाला शिक्षित करण्याबरोबरच योग्य दिशा देण्याचे महत्वपूर्ण काम शिक्षक करत आहेत. समाजाच्या जडणघडणीत त्यांचा वाटा मोठा आहे. सातारा जिल्ह्यातील पुढील तीन महिन्यांत शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होईल. यासह पदोन्नती बाबतही गतिमान प्रक्रिया सुरू आहे. शिक्षकांच्या हितासाठी कायम कटिबद्ध राहू, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या जिल्हास्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. मंचकावर खासदार श्रीनिवास पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खीलारी, शिक्षणाधिकरी शबनम मुजावर, गटशिकणाधिकारी धनजय चोपडे, महेंद्र खंदारे, हेमंतकुमार खाडे, संतोष भोसले उपस्थित होते. यावेळी जिल्हयातील काही शाळांना संगणक संचाचे वाटपही करण्यात आले.
देसाई म्हणाले, 'सरकारी अनुदानासह उत्तम वेतन घेणाऱ्या सरकारी शाळांमध्ये शाळांची अवस्था सुधारण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. सीएसआरच्या माध्यमातून उद्योजकांनी ग्रामीण भागातील शाळा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.'
यावेळी सातारा जिल्ह्यातील दोन वर्षातील गुणवंत शिक्षकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शंभर शाळांना संगणक संच देणाऱ्या संतोष भोसले यांचाही विशेष सत्कार पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.
पालकमंत्र्यांमुळे तब्बल तासभर उशीर !
सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते. तीन वाजता कार्यक्रमाची वेळ असल्याने शिक्षण विभागाने दुपारी अडीच वाजता पुरस्कार प्राप्त शिक्षकांना फेटे बांधून सर्व तयारी केली होती. प्रत्यक्ष मात्र पालकमंत्री शंभूराज देसाई यांना यायला तब्बल एक तास विलंब झाल्याने सर्वांमध्ये नाराजीचा सुर आहे.