मारहाण करून शिक्षक पत्नीला घरात कोंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 03:56 PM2019-04-26T15:56:08+5:302019-04-26T16:01:09+5:30
कौटुंबिक वादातून शिक्षक असलेल्या पत्नीला मारहाण करून घरात साडेसहा तास कोंडून ठेवल्याची घटना सातारा तालुक्यातील गोवे येथे उघडकीस आली. मात्र, शेजाऱ्यांनी सतर्कता दाखवून शिक्षिकेच्या वडिलांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलिसांच्या मदतीने शिक्षिकेची सुटका झाली.
सातारा : कौटुंबिक वादातून शिक्षक असलेल्या पत्नीला मारहाण करून घरात साडेसहा तास कोंडून ठेवल्याची घटना सातारा तालुक्यातील गोवे येथे उघडकीस आली. मात्र, शेजाऱ्यांनी सतर्कता दाखवून शिक्षिकेच्या वडिलांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलिसांच्या मदतीने शिक्षिकेची सुटका झाली.
याबाबत अधिक माहिती अशी, पूनम भोलेनाथ भोकरे (वय ३०, रा. गोवे, ता. सातारा) या सातारा तालुक्यातील एका शाळेवर शिक्षिका आहेत. तर त्यांचा पती एसटी महामंडळामध्ये चालक म्हणून कार्यरत आहे. बुधवारी रात्री कौटुंबिक वादातून पत्नी पूनम भोकरे यांना पती भोलेनाथ याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता बेडरुममध्ये नेऊन बाहेरहून कडी घातली. आतमध्ये मोबाइलही नसल्यामुळे त्यांना कोणालाही फोन करता आला नाही. दुपारी बारा वाजल्या तरी त्या घराबाहेर आल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना शंका आली. त्यांनी डोकावून पाहिले असता त्यांना बेडरुममध्ये कोंडून ठेवल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी थेट पूनम यांच्या वडिलांना हा प्रकार सांगितला.
वडिलांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना मदतीला घेतले. गोवे येथे जाऊन शिक्षिका पूनम यांची सुटका करण्यात आली. पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन पती भोलेनाथ भोकरे याला ताब्यात घेतले.