शिक्षक-विद्यार्थी नातं बनतंय कृत्रिम
By Admin | Published: July 11, 2014 11:14 PM2014-07-11T23:14:47+5:302014-07-11T23:17:09+5:30
गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वेक्षण : मुलं बनतायत ‘परीक्षार्थी’; गुरुजींनीही आखून घेतली विषयापुरती चाकोरी
राजीव मुळ्ये, सातारा गुरुकुलाची पार्श्वभूमी लाभलेल्या आपल्या समाजात शिक्षकाविषयीचा आदर, दबदबा आणि भीती या सर्वच भावना हळूहळू लोप पावत असल्याचा निष्कर्ष ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीद्वारे समोर आला. शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला असता शिक्षक-विद्यार्थी नातं अधिकाधिक कृत्रिम होत असल्याचं पाहायला मिळालं. शनिवारी साजऱ्या होत असलेल्या गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शिक्षकांबद्दल आदर किती वाटतो, धाक-दरारा किती वाटतो आणि भीती किती जणांना वाटते, याची पाहणी ‘लोकमत टीम’ने केली. शिक्षकांशी संवाद साधला. मुलांशी आणि पालकांशीही गप्पा मारल्या. यामधून आधुनिक काळात शिक्षक-विद्यार्थी नातं पूर्वीप्रमाणं राहण्याजोगं वातावरणच नसल्याचं दिसून आलं. वाढत्या विद्यार्थिसंख्येमुळं अनेक शाळांमध्ये दोन ‘शिफ्ट’मध्ये अध्यापन चालतं. शिक्षक आपापल्या ‘शिफ्ट’चा आणि विषयाचा विचार करतात; सर्वांगीण विद्यार्थिहिताचा विचार हळूहळू मागे पडत आहे, असा अनुभव आला. संस्कारक्षम वयात गुरुविषयी असलेला आदर पुढे क्रमश: घटत जातो, असंहा पाहायला मिळालं. प्राथमिक शाळेत शिक्षक-विद्यार्थ्यांत नातं निर्माण होतं. गुरूची ओळख विद्यार्थ्याला तेव्हा प्रथमच होत असल्यामुळं या कोवळ्या वयात या नात्यात ओलावा असतो. या वयात शिक्षकाशी जडलेलं नातं विद्यार्थी कायम जपतात. दहावी-बारावी पास झाल्यावर अनेक विद्यार्थी ‘पहिल्या शिक्षका’ला पेढे देतात. कुठेही भेटले, तरी आदरानं नमस्कार करतात. पूर्वीची पाया पडण्याची पद्धत मागं पडली असली, तरी तोच आदर या शिक्षकाविषयी दिसतो. माध्यमिक शिक्षण घेताना ज्या विषयात रस असेल, त्या शिक्षकाशी हे नातं टिकून राहिल्याचा अनुभव येतो. बाकी विषय, विशेषत: अवघड विषय शिकविणाऱ्या शिक्षकाशी व्यक्तिगत नातं निर्माण होत नाही. शाळेतील वातावरण आणि काही सामाजिक घटकही याला जबाबदार आहेत. नोकरी मिळाली की झालं, अशा भावनेतून काही शिक्षक काम करतात. त्यांना विद्यार्थ्यांशी नातं वाढविण्यात रस नसतो. आपल्या विषयापलीकडं ते फारसं पाहत नाहीत. आपोआपच शिक्षक-विद्यार्थी नात्यावर परिणाम होतो. काही शिक्षकांच्या मते, आधुनिक शैक्षणिक साधनंही शिक्षक-विद्यार्थ्यांना एकमेकांपासून दूर नेत असल्याचं काही शिक्षकांनी ऐकवलं. डिजिटल क्लासरूम, आकृत्या-ग्राफ्सचा वापर, दृश्य परिणाम साधून मुलांना विषयाच्या अधिक जवळ घेऊन जाण्याचं तंत्र मुलांना अधिक भावत असलं आणि त्याचा परिणामही चांगला होत असला, तरी दुसरीकडे मुलांना शिक्षकाबद्दल फारसं प्रेम उरत नाही, असं काहींचं मत आहे. ‘छडी लागे छमछम...’चे दिवस कधीच मागे पडले. विद्यार्थ्यांना शिक्षा केल्यास पालकांच्या रोषाची भीती वाटते. काही ठिकाणी विकृत शिक्षा केल्या जातात; पण त्यामुळं सगळ्याच शिक्षकांना शिक्षा करण्याची भीती वाटते. परिणामी शिक्षकांविषयीचा दबदबाही कमी होत आहे. उलट शिक्षकच अधिक दबावाखाली असतात. याउलट शिक्षक प्रेमळच असला पाहिजे, त्यानं शिक्षेचा मार्ग स्वीकारता कामा नये, असं सांगणारे शिक्षकही भेटले. मात्र, शिक्षक-विद्यार्थी नातं कृत्रिम बनत चाललंय, या विषयावर या दोन्ही बाजू मांडणाऱ्या शिक्षकांचं एकमत दिसलं.