शिक्षक बदल्यांबाबत वाद!

By admin | Published: April 25, 2017 10:46 PM2017-04-25T22:46:18+5:302017-04-25T22:46:18+5:30

दावे-प्रतिदावे सुरू : समन्वय समिती; रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन

Teacher transfers! | शिक्षक बदल्यांबाबत वाद!

शिक्षक बदल्यांबाबत वाद!

Next



सातारा : शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांच्या अनुषंगाने शिक्षक संघटनांमध्येच वाद चिघळल्याचे पाहायला मिळत आहे. सुगम-दुर्गमच्या अनुषंगाने शासन व प्रशासन राज्य समन्वय समितीशी सहमत असल्याचा दावा करण्यात आला असला तरी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनने याला फारकत घेतली आहे. समन्वय समितीने सर्व शिक्षक संघटनांना सोबत न घेताच निर्णय घेतला असल्याचा आरोप या रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनर्फे करण्यात आला आहे.
शिक्षक बदल्यांच्या अनुषंगाने राज्य समन्वय समितीतर्फे शिक्षक संघाचे नेते शिवाजीराव पाटील, अध्यक्ष राजाराम वरुटे, सचिव केशव जाधव, मधुकर काठोळे, तुकाराम कदम आदींनी तसेच शिक्षक समितीचे सरचिटणीस उदय शिंदे यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व
सचिव असिम गुप्ता यांच्याशी चर्चा केली. या चर्चेमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच शिक्षकांवर अन्याय होऊ नये, यासाठी सकारात्मक धोरण ठरल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनने याला फारकत घेतली आहे. सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत शासनाविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. तो असंतोष व्यक्त करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांचा एकत्रितरीत्या २५ एप्रिल २०१७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार होता. परंतु राज्य समन्वय समिती व पंकजा मुंडे यांच्या बैठकीनंतर अचानक मोर्चा स्थगित करण्यात आला. या बैठकीत लेखी आश्वासन मिळालेले नाही. त्यामुळे सर्वसामान्य शिक्षक अचंबित झाले. तसेच मोर्चा रद्द करताना संघ समितीने रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनला अजिबात विश्वासात घेतले नाही, असा आरोप केला
आहे.
सातारा जिल्हा समन्वय समिती व राज्य समन्वय समिती यांचा काहीही संबंध नव्हता. ही समन्वय समिती फक्त सातारा जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत गठीत झाली होती. परंतु प्रत्येक गोष्टीकडे राजकारण व स्वत:च्या फायद्याचा विचार करणाऱ्या नेत्यांच्यामुळे शिक्षकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. येणाऱ्या काही दिवसांत संघटनांच्या प्रतिनिधी बदलीमध्ये सूट असे शुद्धीपत्रक निघण्याची दाट शक्यता आहे.
यामुळेच मोर्चा स्थगित झाला काय?, अशी शंकाही उपस्थित केली आहे. रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनने मंगळवारी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची भेट घेऊन
विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)
बदलाकडे डोळे...
समन्वय समितीने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी सविस्तर चर्चा करून अडीअडचणी मांडल्या. या अडीअचणींना ग्रामविकास खात्याने सकारात्मक प्रतिसाद दिला. या चर्चेमुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तरी देखील अद्याप लेखी आदेश किंवा शासन निर्णयामध्ये कोणतेही बदल केले नसल्याने शिक्षक संघटना व राज्यातील शिक्षक शासन निर्णयातील प्रस्तावित बदलाकडे डोळे लावून बसले आहेत.

Web Title: Teacher transfers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.