पोवाड्यातून शिक्षकाची कोरोना प्रतिबंधक जनजागृती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:28 AM2021-05-28T04:28:53+5:302021-05-28T04:28:53+5:30
वाई : तालुक्यात पोवाड्याच्या माध्यमातून भरारी पथकातील शिक्षकाची कोरोना प्रतिबंधक जनजागृती सुरु आहे. भयंकर ठरलेल्या कोरोनाच्या ...
वाई : तालुक्यात पोवाड्याच्या माध्यमातून भरारी पथकातील शिक्षकाची कोरोना प्रतिबंधक जनजागृती सुरु आहे. भयंकर ठरलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शासनाकडून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले. ग्रामीण भागात संसर्गाचे वाढते प्रमाण ही प्रशासनाच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे.
मुंबई, पुण्याहून ग्रामीण भागात आलेल्यांचे जास्त प्रमाण, ग्रामस्थांकडून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन होत नसल्याने याला आळा घालण्यासाठी पंचायत समिती सभापती संगीता चव्हाण, उपसभापती विक्रांत डोंगरे, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसूरकर, गटशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांच्या मार्गदर्शनानुसार पंचायत समिती गणानुसार आठ भरारी पथके तयार करण्यात आली.
या पथकातील शाहीर शिक्षक शरद यादव यांच्या टीमने तालुक्यात पंचायत समितीच्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक भरारी पथकातर्फे पोवाड्याच्या माध्यमातून गावोगावी जनजागृती सुरु केली आहे. शाहीर शरद यादव व त्यांचे सहकारी मुख्याध्यापक अनिल जाधव, उमेश मोरे, राजेंद्र नलवडे, उद्धव निकम व विस्तार अधिकारी साईनाथ वाळेकर त्यांची टीम गावोगावी कोरोना प्रतिबंधक जनजागृती करत आहे. लोकांनी नियमांचे पालन करावे यासाठी उद्बोधन करत आहेत. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. विविध स्तरातून या पथकाचे कौतुक होत आहे.
शरद यादव हे प्राथमिक शिक्षकांमध्ये उत्कृष्ट शाहीर आहेत. त्यांनी अनेक प्रकारचे पोवाडे लिहिले अन् गायले आहेत.
(चौकट)
सुट्टी असूनही विविध कामे...
कोरोना महामारीमध्ये त्यांच्या प्रबोधनाचा चांगला परिणाम दिसून येत आहे. तालुक्यातील अनेक शिक्षक सुट्टी असूनही विविध कामे करत आहेत. पोवाड्यातून ते लोकांना मास्क वापरा, सामाजिक अंतर ठेवा, वेळोवेळी हात धुवा, गर्दी करू नका, विनाकारण फिरू नका, दुखणे अंगावर काढू नका, न घाबरता लसीकरण करा, असे आवाहन करत आहेत.