ढाकणीतील शिक्षक सोळा वर्षांपासून पगारापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:13 AM2021-03-04T05:13:00+5:302021-03-04T05:13:00+5:30
म्हसवड : ढाकणी माध्यमिक विद्यालयातील एक शिक्षक तब्बल सोळा वर्षे बिनपगारी ज्ञानदान करत आहेत. त्यामुळे संसाराचा गाडा हाकणे ...
म्हसवड : ढाकणी माध्यमिक विद्यालयातील एक शिक्षक तब्बल सोळा वर्षे बिनपगारी ज्ञानदान करत आहेत. त्यामुळे संसाराचा गाडा हाकणे अवघड झाले असून, रोजंदारी करून उपजीविका भागवत आहेत. गेल्या सोळा वर्षांत ज्ञानदानातून घडवलेले विद्यार्थी मोठमोठ्या पदांवर तसेच विविध क्षेत्रात काम करत आहेत. अजूनही आपले गुरूजन बिनपगारी असल्याचे समजताच, त्यांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गुरूदक्षिणा समजून दोनवेळा आर्थिक मदत केली.
ढाकणी येथील माध्यमिक विद्यालयाची स्थापना २००४ मध्ये झाली आहे. आठवी ते दहावीच्या वर्गासाठी शिक्षक व कर्मचारी असा आठजणांचा स्टाफ आहे. यामध्ये एक कर्मचारी सोडला, तर सर्वजण बाहेरून नोकरीसाठी आलेत. मात्र सोळा वर्षांपासून आज ना उद्या पगार सुरू होईल, या आशेवर सर्वजण अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करत आहेत. एक दिवस रोजगार नाही केला, तर अनेकांना रात्रीची भाकरी मिळत नाही, अशा परिस्थितीत त्यांचा संसार सुरू आहे.
या विद्यालयातून मुलं चांगलं शिक्षण घेऊन बाहेर चांगल्या ठिकाणी नोकऱ्या, उद्योगधंदे करत आहेत. मागे वळून पाहताना त्यांना समजलं की गुरूजनांना पगार नाहीत. याची माहिती मिळताच माजी विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून अश्रू आले.
मुख्याध्यापकांची अवघी दोन वर्षांची सेवा राहिलीय. आजही ते पोट भरण्यासाठी गावात लोकमंगल गोळा करून त्यातून कमिशन मिळवतात. फळविक्रीतून पैसे जमवतात. दुसरे शिक्षक गॅस, स्टोव्ह दुरूस्ती, तर तिसरे शिक्षक वीज फिटिंगची कामे, बेंजो, वाजंत्री वाजवून असे करून आपला उदरनिर्वाह करतायत. इतरही शिक्षक, कर्मचारी रोजंदारी करतायत. सुगी झाल्यावर बळीराजाच्या दारात जाऊन धान्य गोळा करून आपला व आपल्या कुटुंबाचे पोट भरत आहेत. पोटाला चिमटे देत या गुरूजनांनी आपल्याला शिक्षण दिलेय.
आपणही यांच्यासाठी काही तरी केले पाहिजे म्हणून गावातील पोलीस आणि आर्मी ग्रुप ढाकणी, देवा खाडे, युवराज खाडे, रूपेश झेंडे, सतीश सूर्यवंशी या युवकांनी पुढाकार घेऊन दोनवेळा आर्थिक मदतीचा हात दिला. या मदतीमुळे गुरूजनांना मोठा आधार मिळाला आहे.
चौकट
महागाईत एकही व्यक्ती पाच मिनिटे विनामोबदला काम करू शकत नाही; मात्र आज ना उद्या पगार मिळेल, या आशेवर या विद्यालयातील सर्व शिक्षक ज्ञानार्जनाचे काम प्रामाणिकपणे करत विद्यार्थी घडवत आहेत. हे ढाकणी गावचे मोठे भाग्य आहे. म्हणून माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी छोटीशी मदत केलीय.
- सतीश सूर्यवंशी,
माजी विद्यार्थी, ढाकणी
कोट
राज्यात अनेक माध्यमिक विद्यालये अनुदानापासून वंचित आहेत. त्यातच याही विद्यालयाचा समावेश आहे. सोळा वर्षे शिक्षक पगारापासून वंचित आहेत. माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत मदत केलीय, ती आमच्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत खूप मोठी आहे. शासनाने या शाळेला सप्टेंबर २०१९ मध्ये वीस टक्के अनुदान जाहीर केलेय; मात्र अजूनही पगार सुरू केले नाहीत.
- ए. एल. सावंत,
उपशिक्षक, माध्यमिक विद्यालय, ढाकणी