रोपांसाठी शिक्षकांची पदरमोड!
By admin | Published: July 1, 2016 09:46 PM2016-07-01T21:46:19+5:302016-07-01T23:40:15+5:30
कऱ्हाड तालुका : खड्डे खोदले मात्र रोपेच नाहीत; शिक्षण विभागाची अनास्था; अनेक शाळांना ग्रामपंचायतीचे सहकार्य
संतोष गुरव --कऱ्हाड --दोन कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत सामुदायिक वृक्षारोपणाचा कार्यक्रम शुक्रवारी जिल्हाभर साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सर्व शासकीय विभाग, सामाजिक संस्था तसेच शाळा, महाविद्यालयांना सहभागी करून घेण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष खड्डे खोदूनही त्यात लावण्यासाठी शिक्षण विभागाकडून रोपेच उपलब्ध न झाल्याने अनेक शिक्षकांनी स्वत: पदरमोड करून रोपे विकत घेतली. काही शिक्षकांनी त्यासाठी ग्रामपंचायतीत धाव घेतली आणि वृक्षारोपण केले. असे कऱ्हाड तालुक्यात अनेक ठिकाणी चित्र पाहायला मिळाले. दिवसभर मागणी करूनही रोपे न मिळाल्याने वृक्षारोपणाला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले.
वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून सांगणाऱ्या व झाडे लावा, झाडे जगवा असा सतत विद्यार्थ्यांना संदेश देणाऱ्या शिक्षण विभागाकडून ऐन वृक्षारोपण कार्यक्रमासाठी रोपेच मिळाली नसल्याने आपल्याला दिलेले टार्गेट कसे पूर्ण करायचे असा प्रश्न अनेक शाळांतील शिक्षकांना पडला. तर दुसरीकडे शुक्रवारी दोन कोटी वृक्षलागवड कार्यक्रम आहे. तरी अद्यापही रोपे कशी काय आली नाहीत. अशी विचारणा शाळेतील विद्यार्थ्यांकडून होत असल्याने वृक्षारोपण कार्यक्रम आता आपल्यालाच करावा लागणार, असे सांगत अनेक शिक्षकांनी आपली पदरमोड करून रोपे विकत आणली. तर काहींनी ग्रामपंचायतीकडे मागणी केली.
मध्यंतरी दोन कोटी वृक्षलागवड कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यात शासकीय विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत संबंधित विभागांना वृक्षारोपणाचे उद्दिष्टही देण्यात आले. त्यानुसार १ जुलै रोजी विभागांनी वृक्षारोपण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. मात्र, या बैठकीनंतर किती खड्डे खोदण्यात आले याबाबत योग्य माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सादर केली का? हा संशोधनाचा विषय आहे. कऱ्हाड तालुक्यात मध्यंतरी झालेल्या आढावा बैठकीत शिक्षण विभागाकडून खड्ड्यांचा सर्व्हे करण्यात आला असल्याने अद्यापही खड्डे खोदण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी सर्व्हे कशाच्या आधारे करण्यात आला यावरूनही पंचायत समिती सदस्य व अधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. मात्र, तो त्यावेळी तेथेच थांबविण्यात आला.
आता तर दोन कोटी वृक्षलागवड कार्यक्रमाअंतर्गत करण्यात आलेल्या वृक्षारोपणास कऱ्हाड तालुक्यात काही ग्रामपंचायतींकडून रोपे देण्यात आल्याने शिक्षकांनी हा कार्यक्रम पार पाडल्याचे दिसून आले.
शासनाच्या कऱ्हाड तालुक्यास ४२ हजार ५०० रोपांचे टार्गेट देण्यात आल्याने त्यापैकी सामाजिक वनीकरण विभागाकडे आॅनलाईनद्वारे २१ हजार १३६ रोपांची मागणी आली होती. वृक्षारोपणासाठी शासनाकडून तालुकापातळीवर रोपवाटिका केंद्रेही उभारण्यात आलेली होती. कऱ्हाड तालुक्यात वराडे येथे ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ८५ हजार तर वनमहोत्सव रोपतळेअंतर्गत १० हजार रोपे अशी एकूण ९५ हजार रोपे ठेवण्यात आली होती. मात्र, रोपे असूनही ती ऐनवेळी उपलब्ध होऊ न शकल्याने शिक्षकांना गावातील ग्रामपंचायतींमधून रोपे घ्यावी लागली.
विशेष म्हणजे वृक्षारोपणादिवशी संबंधित शाळांनी वृक्षारोपण केलेले फोटो व याबाबतचा अहवाल केंद्रप्रमुखांकडे सादर करण्याच्या सूचनाही शिक्षण विभागातर्फे करण्यात आल्याने शिक्षकांना वृक्षारोपणाचा कार्यक्रम करणे भाग पडले. त्याअनुषंगाने सकाळी वृक्षदिंडीने जनजागृती व त्यानंतर वृक्षारोपण करणे व दिवसभर नियमित पाठ्यक्रम घेणे, असे शाळांचे नियोजन करण्यात आले होते.
जिल्हा परिषदेच्या शाळेत पंचवीस रोपे
दोन कोटी वृक्षलागवड कार्यक्रमांतर्गत १ ते ७ जुलै या कालावधीत सर्व जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. कऱ्हाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत पंचवीस रोपे लावण्याच्या सूचना वरिष्ठांकडून करण्यात आलेल्या आहेत. अशी चर्चा केली जात होती.
ढिसाळ नियोजन
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक मुलाने एक झाड शाळेत येताना आणावे, अशा सूचना शिक्षकांनी दिल्याने पालकांची धावपळ उडाली. शिक्षण विभागाचे ढिसाळ नियोजन यावेळी पाहायला मिळाले.