कोरोना नियंत्रण मोहिमेत शिक्षकांना विमा कवचच नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:37 AM2021-05-01T04:37:03+5:302021-05-01T04:37:03+5:30
(टेम्पलेट) लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : प्रभाग समिती सचिव, लसीकरण नोंदणी करून घेणे, आदी स्वरूपात कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना ...
(टेम्पलेट)
लोकमत न्यूज नेटवर्क,
सातारा : प्रभाग समिती सचिव, लसीकरण नोंदणी करून घेणे, आदी स्वरूपात कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेत साताऱ्यातील १२५० शिक्षक काम करीत आहेत. मात्र, ही सेवा करताना विमा कवच मिळत नसल्याने या शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
गेल्या वर्षापासून आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांच्या सेवाही कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेमध्ये संलग्न केल्या आहेत. त्यानुसार प्राथमिक शाळा, खासगी प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांमधील शासनमान्य शिक्षक हे या मोहिमेत कार्यरत आहेत. प्रभाग समित्यांचे सचिव, लसीकरणाची नोंदणी करून घेणे, डाटा एंट्री करणे, वॉररूममध्ये काम हे शिक्षक करीत आहेत. या कामाच्या माध्यमातून आम्ही रोज पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात येत आहोत. आरोग्य, जीव धोक्यात घालून आम्ही काम करीत आहोत. आमच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्हाला विमा संरक्षणाचे कवच द्यावे, अशी मागणी या शिक्षकांतून होत आहे. या मोहिमेत काम करणारे शिक्षक म्हणतात.
कोट :
गेल्या वर्षीपासून आम्ही कोरोना साथ नियंत्रणासाठी काम करीत आहोत. आमचा पॉझिटिव्ह रुग्णांशी संपर्क येत आहे. त्यात कोणाचा मृत्यू झालेला नाही हे सुदैव आहे. शासनाने आमचा ५० लाखांच्या विमा कवचामध्ये समावेश करावा.
- राजेंद्र भोईटे, इब्टा, सातारा
कोरोना विरोधातील लढाईत आम्ही शिक्षक फ्रंटलाईनला काम करीत आहोत. आरोग्य, जीव धोक्यात घालून आम्ही कार्यरत आहोत. विमा संरक्षण नसल्याने आमच्या असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी शासनाने आम्हाला विमा संरक्षण द्यावे.
- आर. वाय. जाधव, शिक्षक
गेल्या मार्चपासून मी कोरोना नियंत्रणबाबत काम करीत आहे. आता वर्ष झाले, तरी आम्हाला विमा संरक्षण मिळालेले नाही. कोरोनाची वाढती स्थिती पाहता शासनाने कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेतील शिक्षकांना विमा संरक्षण द्यावे.
- शिवाजी देशमुख, सातारा
लस घेतलेल्या शिक्षकांची कोरोना साथरोग नियंत्रण उपाययोजना मोहिमेत प्रतिनियुक्तीवर सेवा संलग्न केली आहे. त्याबाबत शासन आदेशानुसार कार्यवाही केली जात आहे. शासन नियमानुसार शिक्षकांना लाभ मिळतील. त्याबाबत पाठपुरावा केला जाईल.
- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी, सातारा
चौकट :
आतापर्यंत पाच शिक्षकांचा मृत्यू
कोरोनामध्ये राज्यात गेल्या वर्षापासून आतापर्यंत सुमारे दीडशेहून अधिक शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. त्यात सातारा जिल्ह्यातील तीनजणांचा समावेश आहे. त्यांना शासनाचे विमा संरक्षण नव्हते. यंदाही ग्रामविकास विभागाने विमा कवचाबाबत काढलेल्या पत्रकात शिक्षकांचा उल्लेख नाही. त्यामध्ये सुधारणा करून शिक्षकांना समाविष्ट करण्याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे शिक्षकांनी ‘लोकमत’ला सांगितले.
दृष्टिक्षेपात आकडेवारी
मोहिमेतील शिक्षकांची एकूण संख्या : १२५०
माध्यमिक शाळेतील (हायस्कूल) शिक्षक : ७९८
.............