आंतर जिल्हा बदलीनंतर शिक्षिकांना कोसळलं रडू...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 01:05 AM2017-07-28T01:05:59+5:302017-07-28T01:08:24+5:30
सातारा : सातारा जिल्हा परिषदेत आंतर जिल्हा बदलीने एकूण ३५४ शिक्षक बदलून आले आहेत. त्यापैकी हजर झालेले १४८ शिक्षकांना गुरुवारी आॅनलाइन पद्धतीने शाळा देण्यात आल्या. जिल्हा परिषद प्रशासनाने शासन आदेशानुसार जरी आॅनलाईन प्रक्रिया राबवून दुर्गम डोंगरी शाळांचा बॅकलॉॅग भरून काढला
लोकमत न्यूज नेटवर्क
असला तरी या आॅनलाइन प्रक्रियेत महिला शिक्षकांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होऊ लागलीय. दुर्गम डोंगरी भागात जिथं कोणतेही वाहन जाऊ शकत नाही, अशा शाळा महिलांना स्वीकाराव्या लागल्यामुळे सभागृहातच महिला शिक्षिकांना अश्रू अनावर झाले.
जिल्हा परिषदेमध्ये आंतर जिल्हा बदली होऊन आलेल्या प्राथमिक शिक्षकांना गुरुवारी आॅन लाईन पद्धतीने पदस्थापना देण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, शिक्षण सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, उपमुख्यकार्यकरी अधिकारी सत्यजित बढे, शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, एच. एन. यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
बदली प्रक्रिया राबवताना जिल्हा परिषद प्रशासनाने सुरुवातीलाच सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली होती. ही प्रक्रिया पूर्णपणे शासन आदेशानुसारच राबवली जाणार असून, प्रथम दुर्गम, डोंगरी, भागातील शाळा भरल्या जातील. त्यानुसार ही आॅन लाइन प्रक्रिया होईल, हे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख यांनी स्पष्ट करून सर्व सूचना सभागृहातील शिक्षकांना करून प्रक्रियेस सुरुवात केली. ही प्रक्रिया करताना १२१ दुर्गम, डोंगरी शाळा,तर ० शिक्षक असलेल्या १३ शाळा या प्रथम स्क्रीनवर दाखवण्यात आल्या. व सेवाज्येष्ठता यादीनुसार शिक्षकांना आपल्या शाळा निवडण्याचा अधिकार देण्यात आला.
त्यामुळे दुर्गम शाळांमधील पहिल्या फेरीतच सातारा,कोरेगाव,माण, फलटण, खटाव, खंडाळा, तालुक्यातील शाळा पूर्णपणे भरल्या गेल्या.
त्यामुळे नंतरच्या टप्प्यात पाटण, महाबळेश्वर,जावळी, तालुक्यातील शाळा उरल्यामुळे उपस्थित शिक्षकांमध्ये या बदल्यासंदर्भात नाराजी निर्माण झाली. प्रक्रिया सुरू असतानाच काही महिला शिक्षिकांनी या प्रक्रियेवर एकत्र येऊन आक्षेप नोंदवला. यावेळी काही शिक्षिकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने शासन आदेशानुसारच ही प्रक्रिया सुरू असून त्यांचा आक्षेप चुकीचा असल्याचे स्पष्ट करीत पुढील प्रक्रिया पूर्ण केली.
जिल्हा बदलीने हजर झालेल्या १४८ शिक्षकांना आॅन लाइन पद्धतीने जिल्हा परिषदेने पदस्थापना देऊन संबंधित शिक्षकांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी शिक्षण अधिकारी पुनीता गुरव तसेच कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.
महिला शिक्षिकांची गैरसोय दूर करावी..
बदली प्रक्रियेत महिला शिक्षकांनी आपल्यावर अन्याय झाला असल्याचे मत मांडले. दहा वर्ष दुसºया जिल्ह्यात काम करून स्वजिल्ह्यात येऊनही आमची गैरसोयच झाली असल्याची भावना महिलांनी अगदी रडत-रडत मांडली. आरव, पर्वत, खिरखिंडी अशा दुर्गम शाळांवर महिला कशा काम करणार, असा प्रश्न शिक्षिकांनी मुख्यकार्यकारी अधिकारी देशमुख, शिक्षणसभापती राजेश पवार यांच्या समोर मांडला. त्यामुळे प्रशासनाने किमान अशा दुर्गम शाळांमध्ये बदली स्वीकारलेल्या महिला शिक्षिकांना तरी सवलत देता येईल का, याबाबत ग्रामविकास खात्याशी चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी सर्व शिक्षिकांनी केली.
दुर्गम-डोंगरी शाळांचा बॅकलॉक भरून निघाला
जिल्ह्यातील पाटण, जावळी,महाबळेश्वर, अशा दुर्गम डोंगरी तालुक्यातील बहुतांश शाळा या कायमस्वरूपी रिक्तच राहतात. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांनी शासन आदेशाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करीत प्रथम या तालुक्यांमधील रिक्त शाळांचा बॅकलॉग भरून काढण्याच्या उद्देशाने प्रथम दुर्गम-डोंगरी आॅनलाइन प्रक्रियेत घेतल्या. त्यामुळेच अशा भागातील विद्यार्थ्यांना आता शिक्षक मिळाले आहेत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.