समाजाला संपन्न करण्याचे कार्य शिक्षक करतात : शाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:48 AM2021-09-16T04:48:50+5:302021-09-16T04:48:50+5:30
सातारा : कोणत्याही क्षेत्रात तन्मयतेने काम करण्यासाठी समाजाला योग्य दिशा दृष्टी देऊन संपन्न करणे हे शिक्षकांचे काम आहे, असे ...
सातारा : कोणत्याही क्षेत्रात तन्मयतेने काम करण्यासाठी समाजाला योग्य दिशा दृष्टी देऊन संपन्न करणे हे शिक्षकांचे काम आहे, असे प्रतिपादन ज्योतिषाचार्य प्राचार्य रमणलाल शाह यांनी केले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून कऱ्हाड येथील शिक्षण मंडळाच्यावतीने गुरूगौरव समारंभात ते बोलत होते. यावेळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. माधव कुमठेकर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, सचिव चंद्रशेखर देशपांडे, सहसचिव राजेंद्र लाटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांना डॉ. रा. गो. प्रभूणे अमृतमहोत्सवी शिक्षण संस्थाभूषण व विद्यारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्राचार्य शहा म्हणाले, ज्याप्रमाणे कुंभार मडके घडवतो, त्याप्रमाणे सुशिक्षित, सुसंस्कृत पिढीची निर्मिती करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. मागील अनेक वर्षांपासून श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे हिंदवी पब्लिक स्कूल हे काम सातत्याने करत आहे. कोरोनाच्या या काळात शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्यासाठी घेतलेले परिश्रमही निश्चितच कौतुकास्पद आहेत.
बाळासाहेब कुलकर्णी म्हणाले, त्यादृष्टिकोनातून हिंदवी स्कूलमध्ये सुरू असलेले विविध उपक्रम हे इतर शाळांसाठी अनुकरणीय असेच आहेत.
आपले मनोगत व्यक्त करीत असताना अमित कुलकर्णी म्हणाले, कऱ्हाड शिक्षण मंडळाच्यावतीने डॉ. प्रभूणे यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार म्हणजे आजपर्यंत शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाची पोचपावती आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर शिक्षण क्षेत्रात काम करीत असताना आणखी जबाबदारी वाढली आहे. या सन्मानामुळे काम करण्याचे बळ वाढले असून, भविष्यात विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या हिताचे काम करण्याची ग्वाही देतो.
यावेळी डॉ. राजाराम कुंभार यांना डॉ. रा. गो. प्रभूणे गौरवग्रंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच अस्मिता पोद्दार, प्रशांत कुलकर्णी, विष्णू कुलकर्णी, किसन वाघमारे, चंद्रकांत काळे, स्नेहल वाळिंबे, अविनाश भांदिर्गे, गणेश इनामदार, प्रकाश वाघमारे, रोहिणी चव्हाण, अथर्व जोशी यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
सुवर्णा देशपांडे व जीवन थोरात यांनी सूत्रसंचालन केले. सहसचिव राजेंद्र लाटकर यांनी आभार मानले.
फोटो ओळ : कऱ्हाड येथील शिक्षण मंडळाच्यावतीने हिंदवी स्कूलचे संस्थापक-अध्यक्ष, कोल्हापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य अमित कुलकर्णी यांचा प्रा. रमणलाल शहा यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.