पथक आले, पळा.. पळा !
By admin | Published: February 16, 2017 11:12 PM2017-02-16T23:12:28+5:302017-02-16T23:12:28+5:30
निवडणुकीवर वॉच : माण, खंडाळा तालुक्यांत मद्याच्या बाटल्या पकडल्या
सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर जिल्हा प्रशासन ‘वॉच’ ठेवून आहे. जिल्ह्यात जागोजागी धाडी टाकून भरारी पथकाने कारवाया केल्या. माण व खंडाळा या दोन तालुक्यांमध्ये मद्याच्या बाटल्या पकडण्यात आल्या. त्यामुळे ‘भरारी पथक आले पळा...पळा,’ असे म्हणण्याची वेळ काही कार्यकर्त्यांवर आली आहे.
जिल्ह्यातील ६४ जिल्हा परिषद गट व १२८ पंचायत समिती गणांसाठी प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. या निवडणुकीमुळे अनेकांना सुगीचे दिवस आले आहेत. दोन वेळचे जेवण, तोंड ओले करण्याची फुक्कट संधी आणि एक हरी पत्ती रोज मिळत असल्याने प्रचारात सहभागी होऊन रात्रीचा दिवस करणाऱ्या कार्यकर्त्यांची भलतीच चांदी झाली आहे.
कार्यकर्त्यांना सोबत ठेवायचे म्हटल्यावर अनेक उमेदवारांनी त्यांची ‘इत्थंभूत’ सोय केल्याचे जागो जागी पाहायला मिळते. निवडणूक हंगामात हात धुवून घेण्यासाठी अनेकांची लगबग सुरू आहे. घरात कमी पण नेत्यासोबत जास्त अशी अनेकांची अवस्था आहे. त्यातच यात्रांचा हंगाम सुरू असल्याने अनेकजण मिळणाऱ्या मद्याच्या बाटल्या घरी स्टॉक करून ठेवू लागले आहेत.
या परिस्थितीचा अंदाज घेत जिल्हा प्रशासनाने ३७ भरारी पथके स्थापन केली आहेत. ३७ ठिकाणी चेकनाके तयार करण्यात आले आहेत. तसेच जिथे नेत्यांच्या सभा होतात, अथवा कोपरा सभा होतात, तिथे व्हिडिओ शूटिंग केले जात आहे. उमेदवारांची कार्यालयेही तपासली जात आहेत. उमेदवारांच्या खर्चाचा तपशीलही अचानकपणे घेतला जात आहे. प्रत्येक टीममध्ये ४ ते ५ लोक कार्यरत आहेत. अॅक्साईज, सेल्स टॅक्स व पोलिस अशा विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.
भरारी पथकांनी जिल्ह्यात जागोजागी धाडी टाकायला सुरुवात केली आहे. माण तालुक्यातील एका हॉटेलवर कारवाई करून अवैध मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. खंडाळा तालुक्यात दोन खासगी व्यक्ती मद्याच्या बाटल्या घेऊन जात असताना आढळल्याने त्यांना पकडण्यात आले. माण तालुक्यातील शेणवडी फाटा येथे चारचाकी वाहनातून मद्याच्या बाटल्या घेऊन जाताना एका व्यक्तीला पकडण्यात आले. (प्रतिनिधी)