Satara: हुल्लडबाजांची विकृती!, परीक्षेतील यशस्वी मुलींचे फलकावरील फोटोच नेले फाडून
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 01:07 PM2024-05-25T13:07:14+5:302024-05-25T13:09:39+5:30
निर्भया पथकाकडून हुल्लडबाजांवर कारवाई
कऱ्हाड : अल्पवयीन मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढत असतानाच परीक्षेत यश मिळविल्याबद्दल मुलींच्या कौतुकासाठी लावण्यात आलेल्या फलकावरील मुलींचे फोटो फाडून नेण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना मलकापूरच्या आगाशिवनगर परिसरात घडली आहे. संबंधित मुलींच्या पालकांनी तसेच शाळेने याबाबतची तक्रार दिल्यानंतर निर्भया पोलिस पथकाने संबंधित हुल्लडबाजांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली.
मलकापूर शहरातील एका स्कूलमधे प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या कौतुकाचे फलक स्कूलने परिसरात लावले होते. या फलकावर पाच ते सहा गुणवत्ताधारकांचे फोटो लावले होते. मात्र, हुल्लडबाज मुलांनी संबंधित फलकावरील मुलींचे फोटो कापून ते घेऊन गेले. हा प्रकार पालकांसह स्थानिक नागरिकांना समजताच त्यांनी संताप व्यक्त करत पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या कार्यालयात जाऊन तक्रार केली. स्कूल प्रशासनानेही याची दखल घेत पोलिसांना कारवाईबाबतचे पत्र दिले. उपअधीक्षक ठाकूर यांनी तात्काळ कारवाईच्या सूचना दिल्या.
सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाच्या दीपा पाटील, अमोल फल्ले, संतोष सपाटे, सागर बर्गे, प्रवीण पवार, दीपक कोळी यांनी फलक फाडणारांचा शोध घेण्यास सुरुवात केली. संबंधित मुली रस्त्यावरून जाताना ही मुले लपून मोबाइलवर त्यांचे फोटो काढत असल्याचेही पोलिस चौकशीत समोर आले. संबंधित मुलांसह त्यांच्या पालकांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. मुलांकडे पोलिसांनी याबाबत चौकशी करून कडक शब्दात समज दिली.
तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी प्रसंगावधान राखत या घटनेची गंभीर दखल घेतल्याने मुलींचे पालक नाहक मनस्तापातून बाहेर पडले. फलकावरील फोटो फाडणाऱ्या मुलांसह त्यांच्या साथीदारांवर कारवाई करणार असल्याचे निर्भया पथकाच्या पोलिस दीपा पाटील यांनी सांगितले.
मध्यस्थीसाठी महिलेची धावाधाव
फलक फाडून मुलींचे फोटो काढून नेणाऱ्या मुलाला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर हे प्रकरण मिटविण्यासाठी तसेच मध्यस्थी करण्यासाठी एक महिला पोलिस ठाण्यात आली होती. मुलांना पाठीशी घालत त्यांच्यावर कारवाई होऊ नये, म्हणून त्या महिलेचे प्रयत्न सुरू होते. मात्र, पोलिसांनी त्या महिलेला कडक शब्दात समज दिल्याची चर्चा आहे.