बर्फासोबत अश्रूही गोठले...!
By admin | Published: February 12, 2016 10:58 PM2016-02-12T22:58:40+5:302016-02-12T23:39:04+5:30
मस्करवाडी सुन्न : शहीद सूर्यवंशींच्या पार्थिवाची अजून प्रतीक्षा
म्हसवड : सियाचीनमधील हिमस्खलनात मस्करवाडीचे जवान सुनील सूर्यवंशी शहीद झाल्यामुळे दुखवटा म्हणून कुकुडवाडचा शुक्रवारचा आठवडाबाजार भरला नाही. मस्करवाडीत नेते, पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थांची वर्दळ वाढली असून, खराब हवामानामुळे शहीद सुनील यांचे पार्थिव सियाचीनमधून आणण्यात लष्कराला अद्याप यश आले नसल्याने ग्रामस्थांसह संपूर्ण जिल्हा अजूनही प्रतीक्षेतच आहे. दरम्यान, बर्फासोबत वाट पाहून अश्रूही गोठले आहेत.
कुकुडवाडचा आठवडाबाजार शुक्रवारी असतो. मात्र, सुनील सूर्यवंशी शहीद झाल्यामुळे दुखवटा म्हणून बाजार भरलाच नाही. पार्थिवाची मिरवणूक कुकुडवाड-मस्करवाडी मार्गावरून काढण्यात येणार असून, या रस्त्याच्या रुंदीकरण व सपाटीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, पार्थिव आणण्यासाठी लडाखमधून रवाना झालेले हेलिकॉप्टर शुक्रवारीही सियाचीनमधील खराब हवामानामुळे परत आल्यामुळे प्रतीक्षा लांबली आहे. शहीद सूर्यवंशी यांच्या पार्थिवाची प्रतीक्षा जिल्हा गेल्या चार दिवसांपासून करीत आहे. वीर जवानाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी बाहेरगावी आणि परराज्यांत असणारे कुकुडवाड ग्रामस्थ गावी आले आहेत.
शुक्रवारी दुपारी माण तालुक्याच्या अधिकाऱ्यांनी कुकुडवाडी ग्रामपंचायत कार्यालयात शहीद सूर्यवंशी यांच्या अंत्यसंस्कारांचे नियोजन करण्यासाठी बैठक घेतली. पार्थिवाची मिरवणूक कोणत्या मार्गाने न्यायची, अंत्यदर्शन सुलभ कसे होईल, येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग कोठे करायचे, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नियोजन कसे करायचे यावर चर्चा झाली. यावेळी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार सुरेखा माने, बांधकाम विभागाचे शिंगटे, सहायक पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक शाहूराज दळवी, माजी सरपंच संजय जाधव, उपसरपंच तानाजी काटकर, सागर तुपे, ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नेत्यांनी घेतली कुटुंबीयांची भेट
माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी सूर्यवंशी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच अंत्यसंस्काराच्या ठिकाणाची पाहणी करून कुकुडवाड-मस्करवाडी रस्त्याच्या कामालाही भेट दिली.
विधानपरिषद सदस्य व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी कुटुंबीयांची भेट घेतली आणि सुनील सूर्यवंशी यांची एक वर्षाची मुलगी तनया हिच्या नावाची दीड लाख रुपयांची मुदत ठेवपावती करणार असल्याचे सांगितले.
माडी (ता. माण) ही शहीद सुनील सूर्यवंशी यांची सासुरवाडी आहे. दि. ११ रोजी तेथील बाजारपेठ बंद ठेवून शहीद सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.