तहसील कार्यालय आवार समस्यांच्या विळख्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:14 AM2021-03-04T05:14:17+5:302021-03-04T05:14:17+5:30

करंजे : येथील तहसील कार्यालयाच्या आवारात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाहनांच्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे येेथे कामानिमित्त येणाऱ्या लोकांना ...

Tehsil office premises in the grip of problems! | तहसील कार्यालय आवार समस्यांच्या विळख्यात!

तहसील कार्यालय आवार समस्यांच्या विळख्यात!

Next

करंजे : येथील तहसील कार्यालयाच्या आवारात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाहनांच्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे येेथे कामानिमित्त येणाऱ्या लोकांना नाहक त्रासाला सामोेेरे जावे लागत आहे. तसेच आवारात घाणीचे साम्राज्य पसरले असून, सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडत आहे.

तहसील कार्यालयाच्या आवारात पकडलेली वाळूची वाहने तसेच बांधकामाचे साहित्य, वाळूचे ढिगारे, लोखंडी साहित्य, अस्ताव्यस्त लावलेली वाहने, कचऱ्याचे ढीग या कारणांमुळे कार्यालयात येणाऱ्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तहसील कार्यालयात एकतर पार्किंगची सोय उपलब्ध नाही आणि येथे येणारे कामगार सकाळीच आपापल्या वाहनांना अगोदरच पार्किंग करून सगळी जागा व्यापून टाकतात. त्यानंतर आसपासच्या गावांतील कामानिमित्त येणाऱ्या आबालवृद्धांना मिळेल तिथे गाडी पार्क करावी लागते. कोठेही वाहने लावण्यासाठी जागाच मोकळी नसल्याने वाहने मिळेल त्या जागी लावली जात आहेत. वाहनांची कोंडी पाहता कधीही केव्हाही वाहतूक पोलिसांची गाडी वाहने उचलून नेत आहे. जागाच नसल्याने येथे कामासाठी येणाऱ्यांना वाहतूक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागतेय.

या कार्यालयात अक्षरश: चालत जाणे मुश्कील होत आहे. यातच कार्यालयात बांधकाम सुरू आहे. त्यासाठी आणलेली वाळूही मध्येच पडली आहे. त्यामुळे वृद्धांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे.

तहसील कार्यालयातील गर्दी ही नित्याचीच बाब आहे. कोठेही सोशल डिस्टन्सिंग राखले जात नाही तसेच कोणाच्या तोंडाला मास्क नाही, तर कोणाच्या आहे तो नाकावर. एकाच ठिकाणी लोकांच्या झुंडीच्या झुंडी पाहायला मिळत आहेत.

चौकट..

विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची मागणी

या आवारात अनेक ठिकाणी कचरा पडला आहे. लोक कोठेही पान, गुटखा खाऊन जाता-येता थुंकत असल्याने अनेक ठिकाणच्या भिंती रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वार ठिकाणीच वाहनांचे पार्किंग केले जात आहे. त्यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. तसेच नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याने पुन्हा कोरोनाची शक्यता असल्याने मास्क न वापरणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

फोटो..03करंजे

सातारा तहसील कार्यालयासमोरच कचऱ्याचे ढीग पडल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. (छाया : किरण दळवी)

Web Title: Tehsil office premises in the grip of problems!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.