माण नदी वाळू उपसा प्रकरणात तहसीलदार निलंबित, याआधीच बजावण्यात आली होती कारणे दाखवा नोटीस
By दीपक शिंदे | Published: August 26, 2022 07:07 PM2022-08-26T19:07:56+5:302022-08-26T19:09:25+5:30
माण खटाव भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उपशाबाबत आधीच पाच तलाठ्यांचे निलंबन झाले आहे.
म्हसवड (सातारा) : माण खटाव भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उपशाबाबत आधीच पाच तलाठ्यांचे निलंबन झाले आहे. आता यापाठोपाठ माण तालुक्याचे तहसीलदार सुर्यकांत येवले याचे निलंबन झाल्याने माण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. वारंवार सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे माण नदीवरील वाळू उपशाबद्दल तक्रारी येत होत्या. मात्र आमच्या भागात कोणतीही बेकायदा वाळू वाहतूक होत नसल्याचे माणच्या महसूल विभागाकडून सांगितले जात होते.
दरम्यान, एका कारवाई वेळचा व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात आली, यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी पाच तलाठ्यांचे निलंबन केले होते. आता त्याच प्रकरणात माणचे तहसीलदार येवले यांचेही निलंबन झाले आहे. याआधी माण खटावचे प्रातांधिकारी आणि माणचे तहसीलदार येवले या दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर तहसिलदारांचे थेट निलंबन करण्यात आले आहे.