मुसळधार पावसात खडतर रस्ता पार करुन तहसीलदारांनी गाठले चवणेश्वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 01:53 PM2021-08-02T13:53:19+5:302021-08-02T13:56:48+5:30
Satara area collector : कोरेगाव-वाई तालुक्याच्या सीमेवर वसलेले चवणेश्वर हे गाव कोरेगाव तालुक्यातील एकमेव डोंगरावर वसलेले गाव आहे. दरवर्षी पावसाळ्यात या गावच्या रस्त्यावर दरडी कोसळून गावावर संकट येते.
पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव-वाई तालुक्याच्या सीमेवर वसलेले चवणेश्वर हे गाव कोरेगाव तालुक्यातील एकमेव डोंगरावर वसलेले गाव आहे. दरवर्षी पावसाळ्यात या गावच्या रस्त्यावर दरडी कोसळून गावावर संकट येते.
यावर्षी अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने भीतीचे वातारण होते. एकीकडे अतिवृष्टी तर दुसरीकडे दरडी कोसळण्याचा धोका अशा दुहेरी संकटात सापडलेल्या चवणेश्वर ग्रामस्थांना आधार देण्यासाठी तहसीलदार अमोल कदम यांनी चवणेश्वर गाठला. कसलेही संकट आले तरी प्रशासन मदतीसाठी सज्ज आहे, असा विश्वास त्यांनी दिला.
पाटण, वाई, जावळी तालुक्यात भूस्खलन, पूरपरिस्थितीमुळे मोठे नुकसान झाले. यामुळे चवणेश्वर ग्रामस्थांनाही धडकीच भरली. दुर्घटना घडली मदत कधी मिळणार याचीच चिंता त्यांना लागली. याचदरम्यान जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संभाव्य दुर्घटनाग्रस्त ठिकाणांचा आढावा घेऊन प्रांताधिकारी, तहसीलदारांना आवश्यक त्या सूचना केल्या.
चवणेश्वर हे संकटात असलेले गाव असल्याने या गावास भेट देऊन ग्रामस्थांना आधार देण्याची निर्णय तहसीलदार अमोल कदम यांनी घेतला. जोरदार पाऊस कोसळत होता. दरडी ढासळत असताना तहसीलदार अमोल कदम, नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे, मंडलाधिकारी किशोर धुमाळ, तलाठी राहुल नाळे यांनी चवणेश्वर येथे भेट देऊन ग्रामस्थांना आधार दिला.
सरपंच दयानंद शेरे, रमेश पवार, हरिदास शेरे, युवराज शेरे, बजरंग पवार, माधुरी शेरे, नंदा शेरे, किरण पवार यांच्याशी त्यांनी संवाद साधला. भर पावसात गावालगतच्या धोकादायक कड्यांची त्यांनी पाहणी केली.
इंग्रजी आठ अक्षरात वसले गाव
कोरेगाव तालुक्यातील एकमेव डोंगरावर असलेल्या आणि इंग्रजी आठ अक्षरामध्ये बसलेल्या चवणेश्वर गावास नेहमीच नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. पुढे कडा, मागे कडा आणि मध्ये इंग्रजी आठ अक्षरात वसलेले हे पन्नास उंबऱ्यांचे गाव. वणवा लागणे, डोंगर खचणे, दरडी कोसळणे अशा अनेक संकटांचा सामना येथील ग्रामस्थ पिढ्यानपिढ्या करत आले आहेत.
साठ वर्षे झाली तरी या गावास पक्का रस्ता शासन देऊ शकले नाही. २००० मध्ये या गावास पर्यटनस्थळ क वर्ग दर्जा मिळाला. मात्र ठेकेदारांची घरे भरण्यापलीकडे वेगळे काही झाले नसल्याची येथील ग्रामस्थांची तक्रार आहे.